एकाच दिवशी होणाऱ्या विविध विभागातील परीक्षांचे वेळापत्रक बदला – धनंजय मुंडेंची राज्यपालांकडे विनंती

67
Adv

बृहन्मुंबई महानगरपालिका व जलसंपदा विभागामार्फत कनिष्ठ अभियंता या पदासाठी अनुक्रमे येत्या २५ व २५-२६ तारखेला होणाऱ्या पदभरती या दोन्ही परीक्षा उमेदवारांना देता याव्यात यासाठी दोन्हीपैकी कोणत्याही एका परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी विरोधीपक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी राज्यपालांकडे एका पत्राद्वारे केली आहे.

येत्या आठवड्यात दि. २४ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापत्य अभियंता, दि. २५ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेची कनिष्ठ अभियंता या २४३ पदांसाठी तर दि. २५ व २६ रोजी जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता या ५०४ पदासाठी परीक्षा होत आहेत. एकाच दिवशी व वेगवेगळ्या ठिकाणी परीक्षा होत असल्यामुळे उमेदवारांना कुठल्याही एकाच परीक्षेला बसता येणार आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांची अडचण होणार आहे.

ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील होतकरू अत्यंत बिकट परिस्थितीतही आपले शिक्षण पूर्ण करतात. त्यात राज्यात प्रचंड बेरोजगारी वाढलेली असल्यामुळे रोजगाराच्या उपलब्ध संधी प्रत्येकाला आजमवायला मिळायला हव्यात असे श्री. मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे कोणत्याही बृहन्मुंबई महानगरपालिका किंवा जलसंपदा यापैकी एका विभागाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करून उमेदवारांना दोन्हीही परीक्षांना बसता येईल यासाठी संबंधित विभागाला आदेशित करावे अशी विनंती श्री. मुंडे यांनी आपल्या पत्रात केली आहे.

Adv