छत्रपती शिवरायांचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना भाजपच्यावतीने राज्यसभेवर संधी देऊन त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी उदयनराजे प्रेमींकडून होत आहे.
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासात्मक कामाचे अवलोकन करून अवघ्या तीन महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मिळालेल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी उदयनराजे यांचा भाजपमध्ये योग्य सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी व अमित शहा यांनी दिली होती त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये भाजपची मोठी लाट निर्माण झाली. एकेकाळी काँग्रेस -राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्याला उदयनराजेंच्या माध्यमातून मोठे खिंडार पडले. त्यामुळे जिल्ह्यात भगवे वादळ निर्माण झाले.
विधानसभा निवडणुकी बरोबर सातारा लोकसभेची पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव झाला असला तरी कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे दिग्गज शशिकांत शिंदे यांचा पराभव करून त्याठिकाणी शिवसेनेचे महेश शिंदे विजयी झाले. त्याचप्रमाणे मान -खटाव मतदारसंघात भाजपचे जयकुमार गोरे ,पाटणमध्ये शिवसेनेचे शंभूराज देसाई यांनी विजयश्री खेचून आणली. सातारा- जावली विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपचे कमळ फुलवले त्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सेना भाजपने जोरदार मुसंडी मारली. हे यश मिळण्यात उदयनराजेंचा सिंहाचा वाटा राहिला आहे ,त्यामुळे लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांना पराभवाचा सामना करावा लागला असला तरी भाजपने उदयनराजेंना राज्यसभेवर संधी देऊन त्यांना मंत्रीपद द्यावे, अशी मागणी उदयनराजे प्रेमीमधून व्यक्त होत आहे.
छत्रपतींच्या वंशजाचा भाजपने सन्मान करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. त्यामुळे भाजप उदयनराजेंना कधी संधी देणार? याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.