आळंदी येथील यात्रा सुरू होणार असून भाविकांचे येणे सुरू झाले आहे. येणाऱ्या भाविकांना पुरेपूर शुध्द पाणी पुरवठा होणे गरजेचे असून लवकरात लवकर आवश्यक तितके व पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून दयावे असे निर्देश उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत दिले. आळंदीला येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सोयी-सुविधांचे नियोजन करण्यासंदर्भात आज विधानभवनातील उपसभापती दालनात बैठक पार पडली त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री पोकळे, नगरविकास विभागाचे उपसचिव स.ज.मोघे, आळंदीचे मुख्याधिकारी समीर भूमकर, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख राम गावडे, रोहिदास तापकीर,
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका जलनि:सारणचे कार्यकारी अभियंता विजयकुमार काळे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
आळंदी येथे दरवर्षी यात्रेकरू मोठया संख्येने येतात. यावर्षीच्या यात्रेची सुरवात झाली असून मोठया प्रमाणात यात्रेकरू येत आहेत. त्यांना पाण्याचा तुटवडा पडू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यानी काळजी घ्यावी व दि.१९ नोव्हेंबर पासून त्यांना रात्री साधारण ९.०० वा. पासून पाणी उपलब्ध करून दयावे. यात्रेकरुंची पाण्याअभावी गैरसोय होऊ नये यासाठी पाण्याचे नियोजन करणारी टीम तयार करून यात्रेकरूना शुध्द पाणी उपलबध करून देण्याचे नियोजन करावे . तसेच नगरपालिका आणि जिल्हा परिषद यांनी समन्वयाने आवश्यक तितक्या टँकरने पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, असेही निर्देश यावेळी उपसभापती यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यात्रेकरूना सर्व सुविधा उपलब्ध करून दयाव्यात, तसेच येणाऱ्या प्रत्येक भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व संबंधीत अधिकाऱ्यांनी याबाबत दक्षता घ्यावी. भाविकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी व पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी अधिकचे फिरती शौचालये उपलब्ध करुन द्यावीत, असेही यावेळी उपसभापती यांनी सांगितले.
याबैठकीत वाढीव पोलीस बंदोबस्त व यात्रेत हरवलेल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी माहिती कक्ष व मदत कक्ष अधिक लोकाभिमुख करावे त्यासाठी महिला दक्षता समिती व स्वयंसेवकांचे पथके तयार करावीत .या माहितीची पत्रके तयार करुन प्रसिध्दी द्यावी अशा सुचना पिंपरी चिंचवड पोलीस अप्पर पोलीस आयुक्त श्री.रामनाथ पोकळे यांना दिल्या.
अधिक शौचालयांची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन,मोफत औषधोपचार,
खाद्य पदार्थांची स्वच्छता तपासणी, वृक्षारोपण करणे, पर्यटन दृष्टया आळंदी शहरातील प्राचीन मंदिरे तिर्थक्षेत्र विकास करणे व विकास आराखडयाची अपूर्ण कामे याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.व ३०नोव्हेंबर पर्यंत शासनाने दिलेल्या ८कोटींच्या निधीतुन काय प्रगती केली याचा आढावा द्यावा तसेच मुला मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आळंदीतील सर्व आश्रम व शाळांची नोंदणी करणे, जिप व सार्वजनिक विश्रामगृहांचे अतिरिक्त बांधकाम,जिल्हा प्रशासनाने चाकण लोणीकंद मरकळ येथून अवजड वाहतूक सुरळीत चालु ठेवावी या साठी ग्रामीण पोलीस अधिक्षकांशी चर्चा करुन नियोजन करावे, यासंदर्भातही सुचना करण्यात आली.
आळंदीतील स्थानिक रहिवासी व वारकर्यांची व्यवस्था करणारी वाहने यांनाही पोलीस प्रवेश देत नाहीत, त्याबाबत नोकरदारांच्या ओळखपत्रे व वारकर्यांनी लवकर माहिती आळंदी पोलीस स्टेशनला परवानगी मागीतल्यास तशी परवानगी देण्याचे आश्वासन ही पोलीसांनी दिले.