सातारा : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना आधुनिक स्वरूप देऊन नागरिकांना अधिक दर्जेदार व प्रभावी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र’ उपक्रम राबविण्यात येत आहे. सन २०२२-२३ पासून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे.
यामध्ये सन २०२२-२३ मध्ये ६, सन २०२३-२४ मध्ये १८ आणि सन २०२४-२५ मध्ये २१ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. या कामांचा आढावा जिल्हा परिषद सातारा येथील उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती राजू भैया भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत घेण्यात आला.
बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, उपअभियंता तसेच संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
सन २०२२-२३ मधील स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामे पूर्ण झाली आहेत. सन २०२३-२४ व २०२४-२५ मधील बहुतांश केंद्रांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र, काही केंद्रांमध्ये गळती, इमारतींना पडलेल्या भेगा, फरशीची दुरवस्था, पेव्हर ब्लॉकची असमान पातळी, पाणी साचणे, प्लंबिंगची अपूर्ण कामे, शौचालय व स्नानगृहांची दुरुस्ती, रंगकाम आणि वॉटरप्रूफिंग यांसारख्या त्रुटी आढळून आल्या आहेत.
या सर्व त्रुटी तातडीने दूर करण्याच्या सूचना भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच प्रसूतीगृहाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे काही ठिकाणी प्रसूती सेवा बंद असल्याने संबंधित प्रसूतीगृहे तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले. दुरुस्तीच्या कामादरम्यान परिसरात पडलेला मलबा कंत्राटदारामार्फत तातडीने हटविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
कामे सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची उपअभियंता, तालुका आरोग्य अधिकारी आणि शाखा अभियंता यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी. निकृष्ट दर्जाचे काम आढळल्यास संबंधित कंत्राटदार तसेच शाखा अभियंत्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले.
सर्व कामे एका महिन्याच्या आत पूर्ण करावीत आणि काम पूर्ण झाल्याशिवाय हस्तांतरण दाखल्यावर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी करू नये, असे स्पष्ट निर्देशही देण्यात आले.
दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीच्या कामात विद्युत विभागाकडून सीसीटीव्ही व फायर सिस्टिमचे वायरिंग कट झाले असल्यास ते तातडीने दुरुस्त करून पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन व वाठार किरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या मागणीनुसार शवविच्छेदन गृह उभारण्यासाठी अंदाजपत्रक तयार करून आरोग्य विभागाकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित बांधकाम अधिकाऱ्यांना देण्यात आले.
आरोग्य सेवांचा दर्जा उंचावणार
स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक चांगल्या आणि आधुनिक आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णसंख्या आणि प्रसूतींची संख्या वाढविण्यासाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यावर भर देण्यात येणार आहे.
आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रसूती सेवा, कुपोषण, साथरोग तसेच औषधांच्या उपलब्धतेची तपासणी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना नियमित भेटी द्याव्यात, अशा सूचनाही देण्यात आल्या.
“प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट आणि सक्षम झाल्याने ग्रामीण जनतेला त्यांच्या जवळच अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील. त्याचबरोबर ओपीडी व प्रसूती सेवांमध्ये वाढ होण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येतील,” असे राजू भैया भोसले यांनी सांगितले.






