“अडचणींवर मात करण्यासाठी पहिला गुरु हे आपले आई-वडीलच असतात. त्यामुळे त्यांच्याशी कायम एकनिष्ठ राहा. अन्नभेसळ आणि अंमली पदार्थांची अवैध घुसखोरी व तस्करी ही आपल्या आरोग्यासाठी धोकादायक घंटा आहे. ती टाळण्यासाठी महिलांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत ‘विषमुक्त स्वयंपाकघर’ आणि ‘नशामुक्त भारत अभियान’ या मोहिमा हाती घेणे आवश्यक आहे. आपल्या आरोग्यासाठी आणि पुढील आयुष्य सुखकर व निरोगी जगण्यासाठी जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे,” असा मोलाचा सल्ला जिल्हा परिषद सातारा अध्यक्षा तथा कन्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी मा. डॉ. प्रियाताई महेश शिंदे यांनी विद्यार्थिनींना दिला.
जिल्हा परिषद सातारा, जिल्हा परिषद अध्यक्षा मा. डॉ. प्रियाताई महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची कन्याशाळा, सातारा, अरुंधती धवळे कनिष्ठ महाविद्यालय तसेच व्यवसाय शिक्षण विभाग येथे ‘नशामुक्त भारत अभियान’ जनजागृती, ‘विषमुक्त स्वयंपाकघर’ जनजागृती आणि विद्यार्थिनींसाठी पुस्तक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व मान्यवरांच्या हस्ते महर्षी अण्णांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रमुख पाहुण्या मा. डॉ. प्रियाताई महेश शिंदे तसेच कविताताई देशमुख, अध्यक्षा, स्फूर्ती वुमन्स विंग यांचा सत्कार मा. श्री. दत्ताजी थोरात, संचालक, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, पुणे व कन्या शाळा समिती अध्यक्ष यांच्या हस्ते पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्षा मा. डॉ. प्रियाताई शिंदे यांच्या हस्ते प्रसिद्ध लेखिका मल्लिका अमर शेख लिखित ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय’ या पुस्तकाचे विद्यार्थिनींना वितरण करण्यात आले. विद्यार्थिनींमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, त्यांना दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्या वैचारिक व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. विद्यार्थिनींनी उपलब्ध करून देण्यात आलेल्या पुस्तकाचा वाचनासाठी उपयोग करून ज्ञानवृद्धी करावी आणि पुस्तकातून मिळणाऱ्या विचारांचा आपल्या जीवनात सकारात्मक उपयोग करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. विद्यानंद चल्लावर यांनी युवकांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. तसेच प्रत्येकाने स्वतः व्यसनमुक्त राहून ‘व्यसनमुक्ती मित्र’ म्हणून समाजात जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
मार्गदर्शन करताना मा. डॉ. प्रियाताई शिंदे यांनी विद्यार्थिनींना शिक्षणासोबतच आरोग्य, सुरक्षितता, आत्मविश्वास आणि सामाजिक जबाबदारी यांना समान महत्त्व देण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, “आजच्या मुली या उद्याच्या सक्षम समाजाच्या आधारस्तंभ आहेत. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची आणि भविष्याची जबाबदारी स्वतः घ्या. कोणत्याही व्यसनाला आपल्या आयुष्यात स्थान देऊ नका आणि आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींनाही व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करा.”
त्या पुढे म्हणाल्या, “आपण जे अन्न खातो ते आपल्या आरोग्याचा पाया आहे. त्यामुळे सुरक्षित, सकस आणि विषमुक्त अन्नाचा वापर करण्याबाबत प्रत्येकाने जागरूक असणे आवश्यक आहे. निरोगी शरीर, सकारात्मक विचार आणि दर्जेदार शिक्षण यांच्या बळावरच मुली आपल्या आयुष्यात मोठी स्वप्ने साकार करू शकतात.”
कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘नशामुक्त भारत अभियान’ (NMBA) अंतर्गत विद्यार्थिनींमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली. व्यसनांचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम तसेच व्यसनांपासून दूर राहण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ‘विषमुक्त स्वयंपाकघर’ या उपक्रमांतर्गत सुरक्षित, सकस व विषमुक्त अन्नाचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षकांनी ‘नशामुक्त भारत’ आणि ‘विषमुक्त स्वयंपाकघर’ याबाबतची सामूहिक शपथ घेतली.
कार्यक्रमादरम्यान बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, स्फूर्ती महिला विभाग (Women’s Wing) यांच्या अध्यक्षा यांनी शाळेतील चार विद्यार्थिनींचे पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी घेतली. या उपक्रमातून विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीला व सर्वांगीण विकासाला हातभार लागणार आहे. कार्यक्रमास शाळासमितीच्या सदस्य सौ. वृंदाताई शिवदे, श्री. अनंत कांबळे, सौ. श्रुतीताई दीक्षित, स्फूर्ती वुमन्स विंगच्या पदाधिकारी श्रावणीताई पाटील, कविताताई देशमुख व इतर सदस्य तसेच सातारा प्रकल्पातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या शेवटी मा. डॉ. प्रियाताई शिंदे यांनी विद्यार्थिनींशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्यासोबत सेल्फी काढून आनंदाचे क्षण सामायिक केले. विद्यार्थिनींशी साधलेला हा स्नेहपूर्ण संवाद त्यांच्या मनात कायमस्वरूपी प्रेरणादायी आठवण ठरला. विद्यार्थिनींच्या शैक्षणिक, वैचारिक, सामाजिक व आरोग्यविषयक विकासाला चालना देणारा तसेच नशामुक्त, निरोगी आणि सक्षम जीवनशैलीचा संदेश देणारा हा पुस्तक वितरण व जनजागृती कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.






