क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मभूमी नायगाव येथील स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीसाठी राज्य शासनाने १४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली असून, हा निधी सातारा जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आला आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने २३ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे. नायगाव, ता. खंडाळा येथे उभारण्यात येणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक जमीन संपादन आणि प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांसाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करणारे भव्य स्मारक आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या दृष्टीने हा निधी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पामुळे नायगावच्या विकासाला चालना मिळण्याबरोबरच महिला प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षमीकरणालाही बळ मिळणार असल्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.






