सातारा | खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२०३१ या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. कारखान्याच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच्या सर्व २१ उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने कारखान्यावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. या निकालामुळे खंडाळा तालुक्यातील सहकार क्षेत्रात मकरंद लक्ष्मणराव जाधव-पाटील (मकरंद आबा) यांच्या नेतृत्वाची ताकद पुन्हा अधोरेखित झाली आहे.
या निवडणुकीत २१ पैकी २१ जागांवर बिनविरोध यश मिळणे ही केवळ निवडणुकीतील आघाडी नसून सभासद, शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या विश्वासाची पावती असल्याची भावना व्यक्त होत आहे. सहकार क्षेत्रातील एकजूट, संघटनात्मक बांधणी आणि विकासाभिमुख नेतृत्वाच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधकांना संधी न देता कारखान्यावरील आपले वर्चस्व कायम राखले आहे.






