Monday, November 9, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City साताऱ्यात वाहतूक कोंडीचा विळखा दिवसेंदिवस घट्ट;

साताऱ्यात वाहतूक कोंडीचा विळखा दिवसेंदिवस घट्ट;

26
Adv

सातारा | दिवाळीचा सण आणि खरेदीची लगबग सुरू असतानाच यंदाच्या दिवाळीत सातारा शहरातील वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

राजवाडा ते देवी चौक या प्रमुख मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडीने सातारकर नागरिक हैराण झाले. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत आलेल्या नागरिकांना वाहनांच्या गर्दीत तासन्तास अडकून पडण्याची वेळ आली.
दिवाळीच्या सणासुदीत सर्वसामान्य नागरिकांपासून लोकप्रतिनिधींपर्यंत अनेकांना या वाहतूक कोंडीचा फटका बसला.

बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढणार हे माहीत असतानाही वाहतुकीचे योग्य नियोजन का करण्यात आले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. राजवाडा ते देवी चौक परिसरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि प्रभावी नियंत्रणाचा अभाव प्रकर्षाने जाणवला.
एकीकडे दिवाळीचा आनंदोत्सव सुरू असताना दुसरीकडे ट्राफिक विभाग आणि सातारा पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे सातारकरांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला. सणासुदीच्या काळात वाहतुकीचे नियोजन करणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना ऐन दिवाळीतच नागरिकांना त्रास सहन करावा लागणे दुर्दैवी आहे. दिवाळीपूर्वीच सातारकरांना वाहतूक कोंडीच्या समस्येने शिमगा साजरा करायला लावणाऱ्या या कारभाराबाबत आता प्रशासनाने उत्तर द्यावे, अशी संतप्त भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

सातारा नगरपरिषद आणि शहर वाहतूक शाखेने या गंभीर समस्येवर तातडीने ठोस तोडगा काढणे गरजेचे बनले आहे. दिवसेंदिवस सातारा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर होत असून, सणासुदीपुरती मर्यादित न राहता आता ही नागरिकांची रोजची डोकेदुखी बनत चालली आहे. या कोंडीत लोकप्रतिनिधींपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकालाच अडकून पडावे लागत आहे. त्यामुळे केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता कायमस्वरूपी वाहतूक नियोजन करून सातारकरांना या त्रासातून मुक्त करावे, अशी मागणी होत आहे.

Adv