Monday, November 2, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावरील नव्या बोर्डातील ‘जिल्हा’च अंधारात!

जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावरील नव्या बोर्डातील ‘जिल्हा’च अंधारात!

35
Adv

सातारा | सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर अवघ्या महिनाभरापूर्वी नव्याने बसविण्यात आलेल्या नामफलकातील विद्युत रोषणाईने आतापासूनच मान टाकली आहे. विशेष म्हणजे, या बोर्डावरील ‘जिल्हा’ हा शब्दच अंधारात गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

नवीन बोर्ड बसवून महिना होत नाही तोच त्यातील लाईट बंद पडल्याने कामाच्या दर्जाबाबत आणि संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचेच कार्यालय या प्रकाराला अपवाद राहिले नाही, ही बाब अधिकच बोलकी आहे.

एकीकडे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना अशा प्रकारच्या विद्युत रोषणाईसाठी खर्च करण्याची नेमकी गरज होती का, असाही सवाल आता उपस्थित होत आहे. सार्वजनिक पैशातून कामे केली जात असतील, तर त्यांचा दर्जा आणि टिकाऊपणा राखण्याची जबाबदारी कोणाची?

काम पूर्ण करून घेण्यात येईल, अशी भूमिका घेतली जाऊ शकते; मात्र महिनाभरातच लाईट बंद पडण्यास जबाबदार असणाऱ्यांवर जिल्हाधिकारी आणि प्रशासन नेमकी काय कारवाई करणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Adv