सातारा : सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधील शाहूपुरी परिसरात सुरू असलेल्या ड्रेनेज पाइपलाइनच्या कामात अंदाजपत्रकानुसार काम झाले नसल्याची गंभीर तक्रार मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे प्रभागातील विकासकामांच्या दर्जाबाबत आणि स्थानिक नगरसेवक विश्वतेज बालगुडे यांच्या लक्षाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
शाहूपुरी येथील चैतन्यधाम बिल्डिंग ते गोसावी घर ते ओढा या दरम्यान करण्यात आलेल्या पाइप ड्रेनेजच्या कामाबाबत सुभाष मल्लाप्पा सर्जे यांनी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, संबंधित कामाचे अंदाजपत्रक आणि प्रत्यक्षात झालेल्या कामामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंदाजपत्रकात नमूद केल्याप्रमाणे चेंबर बसविण्यात आलेले नाहीत. तसेच गटारासाठी अपेक्षित असलेले मीटरप्रमाणे काँक्रीटचे कामही पूर्ण झालेले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. चेंबर बांधताना दोन पाइपच्या मध्ये विटांचे बांधकाम, प्लास्टर आणि फ्रेम टाकून झाकण बसविणे अपेक्षित असताना प्रत्यक्ष पाहणीत काँक्रीटची पाइप फोडून चेंबर बसविल्याचे दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, संबंधित कामाची प्रत्यक्ष पाहणी करून बांधकाम विभागाने काम अंदाजपत्रकानुसार झाले आहे की नाही, याची तपासणी करावी. कामात त्रुटी असल्यास ते पूर्ण करून घ्यावे आणि काम समाधानकारक होईपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करू नये, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.






