पुणे पदवीधर मतदारसंघाच्या नूतन आमदारांच्या भेटीसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील काही कर्मचारी पोहोचल्याने जिल्हा बँकेच्या वर्तुळात नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, संबंधित कर्मचारी हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांच्या जवळचे असल्याची चर्चा असून, त्यांच्या या भेटीमागील राजकीय भूमिका काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, भाजपच्या उमेदवाराचा राजकीय काटा नेमका कोणी काढला, याबाबत जिल्हा बँकेच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. जिल्हा बँकेतील काही कर्मचाऱ्यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांशी असलेली जवळीक आणि नूतन आमदारांच्या भेटीमुळे या चर्चेला आणखी हवा मिळाली आहे.
सहकाराचे मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेत कर्मचारी आपली शासकीय व संस्थात्मक जबाबदारी सांभाळत असताना, राजकीय पक्षांचा प्रचार किंवा राजकीय समीकरणांमध्ये त्यांचा सहभाग असावा का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सहकाराच्या माध्यमातून राजकारण साधले जात असल्याची चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे. भाजपचे जिल्ह्यातील वरिष्ठ नेते या प्रकाराकडे लक्ष देणार का? की जिल्हा बँकेतील राजकीय घडामोडींकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






