सातारा शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील प्रतापगंज पेठ परिसरातील जाधव आवाडात यंदाच्या पहिल्याच पावसात पुन्हा एकदा पाणी तुंबल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. मागील वर्षी निर्माण झालेली परिस्थिती यंदाही जैसे थे असल्याचे चित्र दिसून आले.
परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाचे पाणी निचरा होत नसल्याने रस्ते जलमय झाले. अखेर स्थानिक युवकांनी पुढाकार घेत चेंबर उघडून पावसाच्या पाण्याला वाट करून दिली. त्यामुळे काही प्रमाणात पाणी ओसरले आणि नागरिकांना दिलासा मिळाला.
स्थानिकांच्या मते, पाणी तुंबल्यानंतरही परिसराचे प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक मनोज शेंडे आणि हाकेच्या अंतरावरील नगरसेविका वनिता शिंदे हे घटनास्थळी दिसून आले नाहीत, अशी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की, सातारा पालिका प्रशासन यंदातरी जाधव आवाडातील पाणी तुंबण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करणार का? प्रभाग क्रमांक ७ मधील या भागात प्रभावी पावसाच्या पाण्याचा निचरा होईल, अशी व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.






