Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City महिला आयोग आपल्या दारी’ गुरुवारी सातारा जिल्हयात

महिला आयोग आपल्या दारी’ गुरुवारी सातारा जिल्हयात

819
Adv

– महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत सातारा जिल्हयातील तक्रारींची जनसुनावणी गुरुवार दि. २७ जून, २०२४ रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे सकाळी ११ वाजता होणार असून, आयोगाच्या मा. अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर आणि मा. सदस्य सचिव श्रीमती माया पाटोळे तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. सातारा जिल्हयात होणा-या या जनसुनावणीत महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा, श्रीमती रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, श्रीमती रुपाली चाकणकर दि. २७ जून, २०२४ रोजी सातारा जिल्हयाच्या दौर्यावर असणार आहेत. महिलांना त्यांच्या जिल्हयाच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारीचें निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणीनंतर महिला व बालकांच्या विषयांच्या अनुषंगाने सातारा जिल्हयाची आढावा बैठक होईल. यावेळी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक तसेच कामगार आयुक्त, आरोग्य, परिवहन, शिक्षण आदी विभागाचे अधिकारी उपस्थित असतील. उपरोक्त सर्व कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहेत.

‘महिला आयोग आपल्या दारी’या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्षा,श्रीमती चाकणकर म्हणाल्या,’महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोपर्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे,आर्थिक दृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर सर्व यंत्रणेनिशी जात आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलिस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली कैफियत मांडणा-या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोग करत आहे.

Adv