सातारा आणि जावली तालुक्यात पर्यटनवाढीसाठी नेहमीच आग्रही प्रयत्न करणाऱ्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून जावली तालुक्यात कोयना बॅक वॉटरमधील शिवसागर जलाशयात वॉटर स्पोर्ट प्रकल्प सुरु करण्यास राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार यांनी विधानसभेत बजेट स्पीचमध्ये या प्रकल्पाची घोषणा केली असून या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने कास पठार आणि शिवसागर जलाशय परिसरातील पर्यटनवाढीस मोठी चालना मिळणार आहे. या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार यांचे आभार मानले आहेत.
कास पठार आणि बामणोली भागातील पर्यटन वाढीसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नेहमीच पाठपुरावा केला आहे. जावली तालुक्यातील कोयना बॅक वॉटर मधील शिवसागर जलाशयात वॉटर स्पोर्ट सुरु झाल्यास या भागातील पर्यटन वाढेल आणि त्यातून स्थानिक व्यावसायिक आणि नागरिकांना आर्थिक स्रोत निर्माण होऊन हा संपूर्ण भाग आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. त्यामुळे शिवसागर जलाशयात वॉटर स्पोर्ट सुरु करण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी तसा प्रस्ताव सादर करून ना. अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरु केला होता. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार ना. पवार यांच्या दालनात, त्यांच्याच अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला पर्यटनमंत्री ना, आदित्य ठाकरे, उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे, आ. शिवेंद्रसिंहराजे, सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संचालक यांच्यासह संबंधित सर्वच खात्याचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शिवसागर जलाशयात वॉटर स्पोर्ट सुरु करण्याच्या संदर्भाने सविस्तर विचारविनिमय झाला आणि ना. पवार यांनी या प्रकल्पासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला.
विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिकवेशन सुरु असून आज बजेट सादर करताना ना. पवार यांनी या प्रकल्पाचा उल्लेख करून हा प्रकल्प सुरु करण्यास मान्यता दिली असल्याचे जाहीर केले. या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. कास पठार आणि शिवसागर जलाशय परिसरात पर्यटनवाढीसाठी हरप्रकारे प्रयत्न करणाऱ्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून सातारा ते कास जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरणाचे काम पूर्णत्वास जात आहे. तसेच कास ते महाबळेश्वर या जुन्या शिवकालीन राजमार्गावर जावली तालुक्यातील ओखवडी, भवानीनगर येथे वनविभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या या मार्गात रस्त्याचे काम करण्यास परवानगी मिळवून याही रस्त्याचे काम आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून पूर्णत्वास गेले आहे. कास येथून महाबळेश्वर आणि महाबळेश्वर येथून कास असा प्रवास कमी वेळेत आणि इंधनाच्या बचतीमध्ये करता येणार आहे. या दोन्ही रस्त्यांमुळे कास पठार, बामणोली भागातील पर्यटन वाढणार असून त्याचा फायदा स्थानिकांना होणार आहे.






