Tuesday, June 16, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District नगरसेवक-नगरसेविकांच्या ‘लक्ष्मी दर्शनात’ होणार वाढ

नगरसेवक-नगरसेविकांच्या ‘लक्ष्मी दर्शनात’ होणार वाढ

55
Adv

सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक-नगरसेविकांच्या ‘लक्ष्मी दर्शनाची’ चर्चा रंगात आली असतानाच, पालिकेचे प्रमुख पदाधिकारी मानले जाणारे अनमोल यांनी मात्र या सर्व चर्चांपासून स्वतःला अलिप्त ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीची रंगत आता शिगेला पोहोचली असून, मतदानाच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक-नगरसेविकांच्या ‘लक्ष्मी दर्शनाची’ चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. मुळशी येथे गेलेल्या काही नगरसेवकांचा मुक्काम संपत असतानाच उद्या त्यांचा ताफा महाबळेश्वरमध्ये दाखल होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

विधानपरिषद निवडणुकीत अटीतटीची लढत निर्माण झाल्याने प्रत्येक मताला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे मतदार असलेल्या नगरसेवकांना सांभाळण्यासाठी विविध राजकीय डावपेच रचले जात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यामध्ये ‘लक्ष्मी दर्शन’ हा शब्द पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

दरम्यान, काही नवखे आणि अनुभवी नगरसेवकांनी मात्र या सर्व चर्चांपासून स्वतःला दूर ठेवत कोणत्याही प्रकारच्या ‘लक्ष्मी दर्शनाला’ नकार दिल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे नगरसेवकांचे मुखिया मानले जाणारे अनमोल यांनीही कोणत्याही प्रलोभनापासून दूर राहण्याची भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दुसरीकडे, काही नगरसेवकांनी मात्र ‘डबल बार’ उडवल्याची कुजबुज सुरू आहे. म्हणजेच दोन्ही उमेदवारांकडून ‘लक्ष्मी दर्शन’ घेतल्याची चर्चा शहरात रंगली असून, त्यामुळे निवडणुकीतील नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

आता मतदानाच्या दिवशी या सर्व चर्चांचा निकालावर किती परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा नगरसेवकांच्या निष्ठा, भूमिका आणि ‘लक्ष्मी दर्शनाच्या’ चर्चांनी साताऱ्याचे राजकारण चांगलेच तापवले आहे.

Adv