सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नसतानाच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. केवळ नावावर ठराव मंजूर होताच काही इच्छुकांकडून स्वतःला संचालक झाल्याच्या थाटात वावर सुरू असल्याची चर्चा सहकार वर्तुळात रंगू लागली आहे.
निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच ठरावांवरून वाद, आरोप-प्रत्यारोप आणि पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचणारे तणावाचे प्रकार समोर येत असल्याने ही निवडणूक नेमकी सहकारासाठी आहे की राजकीय वर्चस्वासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विविध संस्थांमधील ठराव, मतदार प्रतिनिधी आणि उमेदवारीच्या चर्चांमुळे राजकीय हालचालींना वेग आला असून, काही ठिकाणी वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्याची चर्चा सुरू आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेली जिल्हा बँक पुन्हा एकदा गटबाजी, शक्तिप्रदर्शन आणि राजकीय संघर्षाचे केंद्र बनणार का? सभासदांच्या प्रश्नांपेक्षा सत्तेच्या समीकरणांनाच प्राधान्य दिले जाणार का? अशा चर्चांना जिल्हाभर उधाण आले आहे.
सहकार संस्थांमध्ये लोकशाही पद्धतीने निवडणुका होणे अपेक्षित असताना, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच वाढणारा तणाव चिंतेचा विषय ठरत आहे. जिल्हा बँकेची निवडणूक शेतकऱ्यांच्या विकासाचा अजेंडा पुढे नेणार की पुन्हा एकदा राजकीय कुरघोड्यांचे व्यासपीठ ठरणार, याचे उत्तर आगामी काळात मिळणार आहे.






