सातारा दि. १५ – राज्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि सातारा जिल्ह्याचे पर्यटन वैभव असलेल्या इतिहासिक वासोटा किल्याचा ट्रेक गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरु होत आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात स्थित असलेला वासोटा व्याघ्रगड या ट्रेकचा दुर्गप्रेमी यांना आनंद घेता येणार असून वासोटा दुर्गपर्यटनासोबत सह्याद्री पर्वतरांगामधील शिवसागर जलाशयातील बोटींग, शेंबडी मठ, मुनावळे धबधबा, ठोसेघर धबधबा, कास पठार इ. निसर्गरम्य ठिकाणांचा पर्यटकांना आनंद घेता येणार असल्याचे मत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी व्यक्त केले.
नैसर्गिक दुर्गमता लाभलेला वासोटा किल्ला पर्यटकांचे आकर्षण स्थान मानला जातो. शिवसागर ओलांडून कोयना अभयारण्यातून या किल्यावर जावे लागते. निबीड जंगल, सदाहरित वृक्षराजी, अथांग जलाशयामुळे या परिसराला एक निराळे वैशिष्ट्य लाभले आहे. वासोट्यावरुन दिसणारे उंच कडे अन खोल दऱ्या मनात धडकी भरवतात. वासोटा दुर्गपर्यटन करिता सातारा जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणापासून 42 कि.मी. अंतरावर असलेल्या वनपरिक्षेत्र बामणोली येथे पर्यटकांना जाणेकरिता स्थानिक बोट क्लब मार्फत बोटींगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते. वासोट्याला जंगल ट्रेकिंगसाठी जाताना मुनावळे, शेंबडी, आंबवडे व बामणोली या ठिकाणांहून बोटीने जावे लागते. बोटीने उतरल्यावर पायथ्याशी घनदाट जंगल आहे याच जंगलात वासोटा किल्ला व्याघ्र्गड ठाण मांडून बसलेला आहे, आणि अशा या किल्याला एकदा तरी भेट देऊन तेथील वैभव अनुभवले पाहिजे. दुर्गपर्यटन करिता पर्यटकांना निसर्ग मार्गदर्शक सोबत नेणे आवश्यक असून वासोटा दुर्गपर्यटन मार्ग प्रवेशापासूनच प्लास्टिक मुक्त झोन असून प्लास्टिकच्या वस्तूंवर पुर्णपणे बंदी आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र हे शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
00






