सातारा शहरातील समर्थ मंदिर ते कास पठार मार्गावरील यवतेश्वर घाट परिसरात सायंकाळच्या वेळी काही जोडप्यांकडून सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह वर्तन, धूम्रपान, मद्यपान तसेच काही वाहनचालकांकडून स्टंटबाजी होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. या प्रकारांमुळे शांतता आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, कुटुंबे तसेच पर्यटकांना त्रास होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यवतेश्वर घाटात वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंती उभारण्यात आल्या आहेत. मात्र, याच परिसरातील कट्ट्यांवर सायंकाळच्या वेळी गर्दी होत असून काही व्यक्तींकडून सार्वजनिक ठिकाणी अनुचित वर्तन केले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. काही वेळा वाद निर्माण झाल्यास संबंधितांकडून रस्त्यावर येऊन गोंधळ घातला जात असल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे.
या प्रकारांमुळे कास पठाराकडे जाणारे पर्यटक, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी घाट परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे आणि सार्वजनिक ठिकाणी कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हाध्यक्ष समीर घाटगे यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देऊन यवतेश्वर घाट परिसरात नियमित पोलिस गस्त, सीसीटीव्ही देखरेख आणि आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी कायदा हातात न घेता अशा प्रकारांबाबत पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहनही निवेदनातून करण्यात आले आहे.
Home Politics|Satara District Satara City यवतेश्वर घाटात ‘प्रेमाचा’ अतिरेक; कुटुंबांसमोर आक्षेपार्ह प्रकारांची तक्रार!






