सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीची प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान दाखल झालेल्या सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी उद्या, ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता बँकेच्या सभागृहात होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या इच्छुक उमेदवारांच्या अर्जांची आता ‘कागदपत्रांची कसोटी’ लागणार आहे.
छाननीवेळी संबंधित उमेदवार स्वतः उपस्थित राहू शकतील किंवा त्यांच्या वतीने लेखी प्राधिकृत केलेल्या सूचकाला उपस्थित राहता येणार आहे. उपस्थित राहणाऱ्या उमेदवार किंवा सूचकांनी फोटो ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे, नामनिर्देशन पत्रांची छाननी मतदारसंघनिहाय केली जाणार आहे. ज्या मतदारसंघाची छाननी सुरू असेल, त्यावेळी केवळ त्या मतदारसंघातील संबंधित उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत सूचक यांनाच उपस्थित राहता येणार आहे.
दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांबाबत कोणाला काही हरकत असल्यास ती लेखी स्वरूपात आणि आवश्यक पुराव्यांसह दाखल करावी लागणार आहे. केवळ तोंडी किंवा पुराव्याशिवाय घेतलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नसल्याचेही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विविध मतदारसंघांत मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने उद्याच्या छाननीकडे संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय लक्ष लागले आहे. कोणाचे अर्ज वैध ठरतात, कोणत्या अर्जांवर हरकती घेतल्या जातात आणि छाननीनंतर निवडणुकीचे राजकीय चित्र कोणत्या दिशेने जाते, याकडे आता उमेदवारांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.






