Monday, September 14, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City पीडब्ल्यूडीच्या दिशादर्शक बोर्डवर सभापतींचा वाढदिवसाचा फ्लेक्स आणखी किती दिवस राहणार?

पीडब्ल्यूडीच्या दिशादर्शक बोर्डवर सभापतींचा वाढदिवसाचा फ्लेक्स आणखी किती दिवस राहणार?

106
Adv

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिशादर्शक फलकाचा वापर नागरिकांना मार्गदर्शनासाठी होणे अपेक्षित असताना, त्याच फलकावर पंचायत समिती सभापतींच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा फ्लेक्स अद्यापही झळकत असल्याचे चित्र समोर आले आहे. वाढदिवसाचा दिवस उलटून गेल्यानंतरही फ्लेक्स कायम असल्याने सार्वजनिक मालमत्तेचा वापर अशा पद्धतीने करण्यास नेमकी परवानगी कोणी दिली, असा सवाल उपस्थित होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या अथवा देखरेखीखाली असलेल्या दिशादर्शक फलकावर राजकीय स्वरूपाचा शुभेच्छा फलक लावला जात असेल, तर संबंधित विभागाने त्याची दखल घेणे अपेक्षित आहे. मात्र, फ्लेक्स अजूनही कायम असल्याने प्रशासनाला हा प्रकार दिसत नाही का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नियम सर्वांसाठी समान की सत्ताधाऱ्यांसाठी वेगळे?
शहरात अनधिकृत फ्लेक्स, जाहिरात फलक आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई केली जाते. मग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिशादर्शक फलकावर वाढदिवसाचा फ्लेक्स लावला गेल्यानंतर तो हटविण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा का सक्रिय होत नाही? सामान्य नागरिकांच्या फ्लेक्सवर नियम आणि लोकप्रतिनिधींच्या शुभेच्छा फलकांवर मौन, असा दुहेरी निकष तर नाही ना? अशी चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे, या फलकामुळे मूळ दिशादर्शक फलकाचा उद्देशच झाकोळला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या फ्लेक्सची तातडीने दखल घेऊन तो हटविणार का आणि संबंधितांवर नियमानुसार कारवाई करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

‘यालाच म्हणायचे का भाजपचे अच्छे दिन?’
सत्ताधारी पक्षाशी संबंधित पदाधिकाऱ्यांच्या शुभेच्छा फलकांना सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे मोकळीक मिळत असेल, तर प्रशासनाचा नियमांचा धाक नेमका कुठे राहिला, असा सवाल उपस्थित होत आहे. सार्वजनिक मालमत्ता ही कोणत्याही पक्षाची किंवा पदाधिकाऱ्याची वैयक्तिक मालमत्ता नाही, याचे भान संबंधितांनी ठेवण्याची गरज आहे.

Adv