सातारा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील दिशादर्शक फलकावरच राजकीय स्वरूपाचा वाढदिवसाचा शुभेच्छा फलक झळकल्याचे चित्र समोर आले आहे. सातारा पंचायत समितीचे सभापती महेश गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या या फ्लेक्समुळे सार्वजनिक मालमत्ता आणि शासकीय दिशादर्शक फलकांच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते, दिशादर्शक फलक आणि सार्वजनिक सुविधांची देखभाल केली जाते. नागरिकांना मार्गदर्शन करणाऱ्या फलकावरच मोठा शुभेच्छा फलक लावला गेल्याने शासकीय यंत्रणेच्या मालमत्तेचा अशा प्रकारे वापर करण्यास परवानगी आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, शहरात अनधिकृत फ्लेक्स, बॅनर आणि जाहिरातींवर कारवाईची चर्चा होत असताना शासकीय दिशादर्शक फलकाची जागाच शुभेच्छा फलकासाठी वापरली जात असेल, तर संबंधित विभाग याकडे डोळेझाक का करत आहे? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
नियम सर्वांसाठी समान असतील तर सरकारी फलकावर लावलेल्या या फ्लेक्सबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका काय? हा आता महत्त्वाचा प्रश्न आहे. संबंधित फ्लेक्सला परवानगी देण्यात आली होती का, परवानगी नसेल तर तो हटविण्याची कारवाई कधी होणार आणि शासकीय मालमत्तेच्या वापराबाबत जबाबदारी निश्चित होणार का, याकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे.
फ्लेक्सबाजीवर कारवाईचा बडगा दाखवताना सरकारी दिशादर्शक फलकांवरच शुभेच्छा फलक लागले तर नियम नेमके कोणासाठी? असा थेट सवाल उपस्थित होत असून, सार्वजनिक बांधकाम विभाग आता यावर काय भूमिका घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Home Latest News Politics|Satara District सरकारी बोर्डावर राजकीय शुभेच्छांचा कब्जा; महेश गाडे यांच्या फ्लेक्सवर PWDची कारवाई कधी?






