Thursday, October 22, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District आचारसंहितेत जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांना सत्काराची घाई!

आचारसंहितेत जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांना सत्काराची घाई!

76
Adv

सातारा | सातारानामा
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर बँकेतील अधिकाऱ्यांकडून बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार करण्याची लगबग चर्चेचा विषय ठरत आहे. सातारा जिल्हा खरेदी-विक्री मतदारसंघातून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे बिनविरोध संचालक झाले. त्यानंतर बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. मात्र, निवडणूक प्रक्रियेदरम्यान अशा सत्कारांचे आयोजन करताना आचारसंहितेचे पालन होते आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मकरंद पाटील यांचा सत्कार करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही

. लोकप्रतिनिधींचा सन्मान करणे ही एक परंपरा आहे. मात्र, जिल्हा बँकेसारख्या महत्त्वाच्या सहकारी संस्थेतील अधिकाऱ्यांनी अशा कार्यक्रमांचे आयोजन करताना नियम आणि आचारसंहितेची चौकट लक्षात घेणे गरजेचे असल्याचे मत सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

नेत्यांच्या पुढे-पुढे करण्याची घाई कशासाठी?
जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असताना काही ठराविक अधिकाऱ्यांकडून नेत्यांच्या पुढे-पुढे करण्याची घाई केली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार करताना अधिकाऱ्यांनी नेमकी कोणती नियमावली विचारात घेतली, आचारसंहितेच्या काळात अशा कार्यक्रमांना परवानगी आहे का आणि त्याबाबत प्रशासनाची भूमिका काय, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे.
बँकेतील अधिकारी हे संस्थेच्या नियमांनुसार काम करण्यासाठी असतात. राजकीय नेत्यांशी सौहार्दाचे संबंध ठेवणे वेगळे आणि त्यांना खूश करण्यासाठी घाईघाईने सत्काराचे आयोजन करणे वेगळे, अशी चर्चा सहकार क्षेत्रात रंगू लागली आहे.
सत्काराला विरोध नाही; नियमांचे पालन महत्त्वाचे!
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पारदर्शकता आणि नियमांचे पालन यांना प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे मकरंद पाटील यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याचा सत्कार करतानाही आचारसंहितेच्या नियमांचा विचार होणे अपेक्षित आहे. संबंधित सत्कार आचारसंहितेच्या कक्षेत येतो का, याबाबत बँकेच्या प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडणे गरजेचे आहे.

सत्कार जरूर करा; पण तो नियमांच्या चौकटीत राहूनच! अन्यथा नेत्यांच्या सन्मानापेक्षा अधिकाऱ्यांची राजकीय जवळीक दाखवण्याची धडपडच अधिक चर्चेत राहील.

Adv