सातारा : आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ करिता फलटण तालुक्यातील जमीनी मोठया प्रमाणात संपादित झाल्या आहेत. सदर संपादन जमिनीतील बांधकाम, घरे, शेड, फळझाडे, विहरी, पाईप लाईन यांचा मोबदला शासनाने मोठया प्रमाणात शेतकऱ्यांना दिलेला आहे.
परंतु काही लोकांनी बेकायदेशीर दुबार संपादन करुन संपादीत जागेमध्ये बांधकामे नसताना बांधकामे (बंगले) संपादित झाली असल्याचे शासकीय कर्मचाऱ्यांना हाताशी धरून शासनाची फसवणूक करुन लाखो रुपयांची लूट केलेली आहे. मौजे पिंप्रद ता. फलटण येथील गट नं ८६३ मधील जमीन संपादन झालेली असून निवाड्या अन्वये बाधित शेतकऱ्यांना जमिनीची, बांधकामाची, झाडांची, नुकसान भरपाई शासनाने सन २०२० मध्ये अदा केली होती. असे असताना खातेदार शशिकला दशरथ घनवट यांनी राहता बंगला, घर संपादन झालेल्या २८४४ चौ. मी जागेमध्ये येत नसताना हि संपादन बाबत सन २०२३ मध्ये भुसंपादन कार्यालयाकडून पुरवणी निवाडा करून घेऊन जे बांधकाम बंगला, घर संपादन झालेच नाही
त्याबाबतची नुकसान भरपाई रक्कम ३३ लाख ६३ हजार ५९८ रुपये (अक्षरी तेहतीस लाख त्रेसष्ट हजार पाचशे अठ्यानऊ रुपये) शासनाची फसवणूक करून स्वीकारली असल्याचे निदर्शनास आलेमुळे जिल्हाधिकारी सातारा व उपजिल्हाधिकारी भुसंपादन क्र. १६ सातारा यांना प्रकरणाची चौकशी करून दोषी आढलेस तात्काळ कारवाई करण्याबाबत निवेदन दिले आहे. १४ ऑगस्ट रोजी संबंधितांकडून याप्रकरणी कारवाई न झाल्यास दि. १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा निखिल मोरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.






