सातारा शहरातील राधिका रोडवर अवघ्या दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या रस्त्याच्या पॅचिंगच्या कामाची अवस्था नागरिकांसमोर उघड झाली आहे. पॅचिंगसाठी टाकलेले डांबर अक्षरशः नागरिकांच्या पायाला तसेच वाहनांच्या टायरला चिकटत असल्याने कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घाईघाईने केलेल्या या पॅचिंगची गुणवत्ता नेमकी कोण तपासणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
नगराध्यक्षांना सीसीटीव्ही पाहण्यातून वेळ मिळत नसेल, तर राज्याचे बांधकाम मंत्री यांनी स्वतः राधिका रोडची पाहणी करावी, अशी मागणी सुशांत मोरे यांनी केली आहे. ‘दोन दिवसांपूर्वी केलेला रस्ता आजच उखडण्याच्या अवस्थेत असेल, तर कामाच्या गुणवत्तेची जबाबदारी कोणाची?’ असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, लातूर येथील निवृत्त बांधकाम अधिकाऱ्याची सातारा बांधकाम विभागातील नियुक्ती/भूमिकेबाबतही चर्चा सुरू असून, त्याचा शहरातील रस्त्यांच्या कामांवर नेमका काय परिणाम होत आहे, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. राधिका रोडवरील पॅचिंगची तांत्रिक तपासणी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.






