Wednesday, September 9, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City ठेकेदाराच्या कामाला प्राधान्य; मान्यवरांच्या भिंती मात्र रंगाविना!

ठेकेदाराच्या कामाला प्राधान्य; मान्यवरांच्या भिंती मात्र रंगाविना!

13
Adv

सातारा शहरातील भाजी मंडई परिसरात सुरू असलेल्या रंगकामावरून पालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठेकेदाराने आपल्या ठेक्यातील कामाला प्राधान्य देत रंगकाम उरकले; मात्र त्याच परिसरातील भिंतीवर शहराची मान उंचावणाऱ्या मान्यवरांच्या प्रतिमा असलेल्या भिंतीला साधा रंग देण्याचेही भान ठेवले नाही.
विशेष म्हणजे, संबंधित ठेकेदाराला पालिकेतील थेट पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा असल्याने ‘ठेकेदाराला जपायचे, पण शहराचा इतिहास जपायचा नाही’ अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
भाजी मंडईत रंगकामासाठी निधी आणि ठेका उपलब्ध असताना, शेजारीच असलेल्या ऐतिहासिक व मान्यवरांच्या प्रतिमांच्या भिंतीकडे दुर्लक्ष का करण्यात आले? कामाचा दर्जा, नियोजन आणि ठेकेदाराच्या कामावर पालिकेचे नियंत्रण नेमके आहे तरी कुठे? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या व्यक्तींच्या प्रतिमा जतन करणे आणि त्यांच्या स्मृती असलेल्या भिंती स्वच्छ व सुशोभित ठेवणे ही पालिकेची जबाबदारी आहे. मात्र प्रत्यक्षात ठेकेदाराच्या कामाला प्राधान्य आणि शहराच्या अस्मितेला दुय्यम स्थान मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
पालिका पदाधिकारी ठेकेदारांना जपण्यात व्यस्त आहेत की शहराचा चेहरामोहरा सुधारण्यात, असा सवाल आता सातारकरांकडून उपस्थित केला जात आहे.

Adv