Wednesday, September 9, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District गणरायाचे आगमन, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपच्या सातारा पालिकेचे ‘हिंदुत्व’ कुठे?

गणरायाचे आगमन, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपच्या सातारा पालिकेचे ‘हिंदुत्व’ कुठे?

11
Adv

सातारा शहरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून विविध गणेश मंडळांचे आगमन सोहळे मोठ्या जल्लोषात सुरू आहेत. मात्र, गणरायाच्या स्वागतासाठी रस्ते सज्ज करण्याऐवजी शहरातील अनेक रस्त्यांवरील खड्डे, उघडीवाघडी ठिकाणे आणि झाडांच्या लोंबकळणाऱ्या फांद्या जैसे थेच असल्याने गणेश मंडळांमध्ये पालिकेच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गणेश आगमनाचे मार्ग आधीच निश्चित असताना रस्त्यांची डागडुजी, खड्डे बुजविणे, धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणे आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या बाबी दूर करणे ही पालिकेची जबाबदारी आहे. मात्र प्रत्यक्षात आगमन सोहळे सुरू झाले तरी अनेक ठिकाणी परिस्थितीत अपेक्षित बदल झालेला दिसत नाही.

सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहराचा कारभार पाहणाऱ्या पालिकेतील पदाधिकाऱ्यांना गणरायाच्या आगमनाच्या मार्गावरील खड्डे कॅमेऱ्यात दिसत नाहीत का? असा संतप्त सवाल गणेश मंडळांकडून उपस्थित केला जात आहे.
दरवर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठमोठ्या घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्यावर खड्डे, अस्वच्छता आणि अडथळे कायम असल्याने पालिकेच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘टक्केवारी’च्या चर्चेने राजकारण तापले
शहरातील विकासकामांबाबत नागरिकांमध्ये आणि गणेश मंडळांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू असून ‘टक्केवारी बंद झाल्याने पदाधिकारी लालबुंद झाले आहेत का?’ असा उपरोधिक सवालही आता उपस्थित केला जात आहे. विकासकामांपेक्षा ठेके आणि राजकीय गणितांनाच अधिक महत्त्व दिले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होत असेल, तर ही बाब सत्ताधाऱ्यांसाठी निश्चितच चिंतेची आहे.

Adv