सातारा, दि. १ सप्टेंबर : सातारा शहरातील बहुप्रतीक्षित सिटी बससेवा सुरू करण्यासाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याला मंगळवारी मंत्रालयात महत्त्वाचे वळण मिळाले. सिटी बसच्या मागणीसाठी मंत्रालयात गेलेल्या जयवंत निकम यांना तब्बल तीन तास रांगेत उभे राहिल्यानंतर प्रवेश मिळाला. त्यानंतर त्यांनी परिवहन मंत्र्यांची भेट घेत सातारकरांच्या सिटी बसच्या प्रश्नावर चर्चा केली.
परिवहन मंत्र्यांनी हा विषय आपल्या सहाय्यक सचिवांकडे मांडण्यास सांगितले. सहाय्यक सचिवांकडे सातारा शहर सिटी बसचा विषय मांडला असता, सिटी बस सेवा हा विषय एसटी महामंडळाच्या अखत्यारीत येत नसून नगरपालिका स्तरावर त्याची जबाबदारी घ्यावी, अशी भूमिका परिवहन विभागाकडून मांडण्यात आल्याचे निकम यांनी सांगितले.
यानंतर निकम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. सातारा शहरातील सिटी बससेवेसाठी आपण गेल्या वर्षभरापासून प्रस्तावावर काम करत असल्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी सांगितले. परिवहन विभागाकडून मिळालेल्या उत्तराची माहिती त्यांच्यासमोर ठेवण्यात आली.
पालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने सिटी बस योजना केवळ नगरपालिकेच्या माध्यमातून राबविणे शक्य नसून एसटी महामंडळाच्या माध्यमातूनच ही सेवा सुरू करण्याची गरज आहे, अशी भूमिका मंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट केली. त्यासाठी ‘विशेष बाब’ म्हणून मागील कॅबिनेट बैठकीत हा विषय मांडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
येत्या महिनाभरात सिटी बसच्या गाड्या सातारच्या रस्त्यावर धावतील, असा विश्वास मंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी दिल्याचे निकम यांनी सांगितले. त्यामुळे सिटी बसच्या मागणीला पुन्हा एकदा आशेचा किरण मिळाला आहे.
मात्र, केवळ आश्वासनावर समाधान न मानता सिटी बस प्रत्यक्ष सातारच्या रस्त्यावर धावेपर्यंत आपली लढाई सुरूच राहणार, असा निर्धार निकम यांनी व्यक्त केला. शिवेंद्रसिंहराजेंकडून ‘विशेष बाब’ म्हणून सुरू असलेल्या प्रयत्नांना सातारकरांच्या जनआंदोलनाची ताकद मिळाली तर हा प्रश्न लवकर मार्गी लागू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
“महिनाभरात गाड्या सातारच्या रस्त्यावर धावल्या तर आपण जिंकलो असे समजू; पण तोपर्यंत लढाई थांबणार नाही,” असा स्पष्ट संदेश देत निकम यांनी सातारकरांना आवाहन केले आहे.
सिटी बससाठी आता आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष बस हवी! सातारकरांनी या लढ्यात सहभागी व्हायचे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
— जयवंत निकम
मो. ९८२०५९३४०८






