Friday, September 4, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City दहीहंडीच्या थरांपेक्षा डीजेच्या आवाजाचा थर मोठा होऊ नये,

दहीहंडीच्या थरांपेक्षा डीजेच्या आवाजाचा थर मोठा होऊ नये,

78
Adv

सातारा : राज्यभर डीजे आणि ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना आगामी दहीहंडी उत्सवात सातारा जिल्ह्यात वाजणाऱ्या डीजे आणि डॉल्बीबाबत पोलिस प्रशासनाची भूमिका काय राहणार, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. दहीहंडी उत्सवात पारंपरिक थर उभारण्यापेक्षा डीजेच्या दणदणाटाचाच ‘थर’ वाढणार नाही ना, अशी चिंता ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजातील डीजे, डॉल्बी आणि ध्वनिवर्धकांचा वापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी नेमकी कशी होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी कालच डॉल्बी बंद आणि ध्वनिप्रदूषणाच्या प्रश्नावर जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. गणेश उत्सव दहीहंडी व इतर उत्सव साजरे करताना धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचे पालन व्हावे; मात्र त्याचवेळी नागरिकांच्या आरोग्याचा, ज्येष्ठ नागरिकांचा, विद्यार्थ्यांचा तसेच रुग्णांचा विचार करून ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पोलिस नेमकी कोणती भूमिका घेणार?
दहीहंडीच्या दिवशी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजेवर कारवाई होणार की ‘उत्सव आहे’ म्हणून पोलिसांकडून दुर्लक्ष केले जाणार, हा खरा प्रश्न आहे. कायदा सर्वांसाठी समान असेल, तर उत्सवाच्या नावाखाली ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवरही नियमाप्रमाणे कारवाई होणे अपेक्षित आहे.
एकीकडे राज्यात डीजे बंदी आणि ध्वनिप्रदूषणाच्या प्रश्नावर चर्चा होत असताना दुसरीकडे सातारा जिल्ह्यात प्रत्यक्षात काय घडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पोलिसांनी आधीच स्पष्ट भूमिका जाहीर करून उत्सव आयोजकांना नियमांची जाणीव करून दिल्यास ऐनवेळी निर्माण होणारा वाद टाळता येऊ शकतो.
‘क्रांतिकारी’ जिल्ह्यात पोलिसांची भूमिका संशयाच्या पलीकडे असावी
सातारा हा सामाजिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या जागरूक जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा जिल्ह्यात कायद्याची अंमलबजावणी करताना पोलिस प्रशासनाची भूमिका कोणत्याही दबावापासून मुक्त आणि समान असणे आवश्यक आहे, असे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे.
‘एका मंडळासाठी एक नियम आणि दुसऱ्यासाठी दुसरा नियम’ अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये. डीजे किंवा डॉल्बीला परवानगी असेल तर त्याची स्पष्ट नियमावली असावी आणि परवानगी नसेल तर कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाई झाली पाहिजे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दहीहंडीचा उत्सव उत्साहात साजरा होऊ द्या; मात्र दहीहंडीच्या थरांपेक्षा डीजेच्या आवाजाचा थर मोठा होऊ नये, एवढीच अपेक्षा नागरिकांची आहे. आता जिल्हा पोलीस प्रशासन या प्रश्नावर काय भूमिका घेते आणि दहीहंडीच्या दिवशी प्रत्यक्षात काय कारवाई होते, याकडे साताऱ्याचे लक्ष लागले आहे.

Adv