सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. येत्या पंधरा दिवसांत प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू होत आहे. आजपर्यंत दिग्गजांच्या नेतृत्वाखाली डीसीसी बँक ही राजकारणविरहित शेतकरी-सभासद केंद्रबिंदू मानून वाटचाल करीत आहे. सातारा डीसीसी बँक ही देशात एक आदर्श बँक म्हणून नाबार्डसह अनेक पातळ्यांवर नावाजली गेली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी-सभासद, ठेवीदार, कर्जदार, सामान्य खातेदार, नागरिक आणि बँकेचा कणा असलेल्या सेवकवृंदाच्या हितासाठी ही संचालक निवडणूक वैयक्तिक किंवा पक्षीय राजकारणविरहित करण्यासाठी सर्व संबंधितांनी आपले बहुमूल्य योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुका नजीकच्या काळात होऊ घातल्या आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नेतृत्व करताना अनेक दिग्गजांनी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून, जिल्हा बँकेचे व्यवस्थापन पाहिलेले आहे. सेवकवर्गानेही आपले सर्वोच्च योगदान बँकेच्या प्रगतीकरिता दिले आहे. त्यामुळेच सातारा डीसीसी बँक ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरी अर्थवाहिनी ठरली आहे. शेतकरी हिताला प्राधान्य देत उच्च दर्जाची बँकिंग सेवा बँकेच्या सुमारे ३१७ शाखांच्या माध्यमातून दिली जात आहे. ६७ एटीएम, २ विस्तारित शाखा, ६५० मायक्रो एटीएम, ऑनलाइन सुविधा बँकेने पुरवून शेतकरी-खातेदार, ठेवीदार यांच्या गरजेला सहकार्याचा हात देत, त्यांच्या आर्थिक जीवनाला एक आयाम दिला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळवले आहेत. इतकेच नव्हे तर बँकेचा सतत १९ वर्षे निव्वळ एन.पी.ए. सातत्याने झिरो परसेंट राहिलेला आहे. बँकेची कर्जवसुली ९५ टक्क्यांहून अधिक आहे. राज्यातील ३१ जिल्हा मध्यवर्ती बँकांपैकी बऱ्याचशा सहकारी बँकांमध्ये राजकारण शिरल्यावर एक तर त्या बँका नावालाच उरल्या किंवा त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची उदाहरणे आपल्याला दिसून येतील.
सहकार क्षेत्रात, त्यातही सहकारातील आर्थिक संस्थेमध्ये काम करताना राजकारणाचा चष्मा किंवा राजकारणाचे जोडे हे बाहेरच ठेवणे अत्यंत आवश्यक ठरते. त्यास अनुसरूनच “एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ” या वचन-उक्तीप्रमाणे सर्वांच्या सहकार्याने, सहभागाने आणि समान विचाराने सातारा जिल्हा बँकेने गेल्या अनेक दशकांपासून केलेली नेत्रदीपक प्रगती निश्चितच अतुलनीय-प्रेरणादायी आहे.
या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत केवळ आणि केवळ शेतकरी, खातेदार इत्यादींचे सर्वांगीण हित डोळ्यासमोर ठेवून, राजकारणविरहित करण्यासाठी सर्वांनी आपल्या परीने योगदान द्यावे, असे आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले असून, बँकेची निवडणूक सर्वांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकारणविरहित झाली पाहिजे, जेणेकरून सातारा जिल्ह्याची वैचारिक सहकार संस्कृती पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित होईल.
आज शेतकरी-कष्टकऱ्यांनी सर्व लोकप्रतिनिधींना आपले समजून वेळोवेळी सहकार्य केले आहे. आज शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची ही बँक राजकारणविरहित राहील, असे कृतीमधून आपण दाखवून दिले पाहिजे, असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
Home Latest News Politics|Satara District शेतकऱ्यांची बँक’ राजकारणापासून दूर ठेवा; निवडणुकीत सर्वांनी सहकार्य करावे : खा उदयनराजे






