Wednesday, July 22, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City प्रोसिडिंगवर नगराध्यक्षांची सही; उपनगराध्यक्षांची अवहेलना?

प्रोसिडिंगवर नगराध्यक्षांची सही; उपनगराध्यक्षांची अवहेलना?

112
Adv

सातारा | प्रतिनिधी
सातारा नगरपालिकेच्या कारभाराबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. नगरपरिषदेच्या मागील सभेच्या इतिवृत्त (प्रोसिडिंग) वर नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी सही केल्याची माहिती समोर आली असून, या प्रक्रियेदरम्यान उपनगराध्यक्ष दत्तात्रय बनकर यांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. यामुळे पालिकेतील अंतर्गत समन्वयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
विशेष म्हणजे, आर्थिक व्यवहारांशी संबंधित बिलांच्या धनादेशांवर (चेक) सही करताना अत्यंत बारकाईने पडताळणी करणारे नगराध्यक्ष, सभेच्या प्रोसिडिंगवर सही करताना तोच बारकावा का दिसला नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सभेच्या इतिवृत्तातील प्रत्येक नोंद, निर्णय आणि कायदेशीर बाबींची खात्री करूनच त्यावर अंतिम सही होणे अपेक्षित असताना, या प्रक्रियेत आवश्यक ती दक्षता घेण्यात आली का, याबाबतही चर्चा सुरू आहे.
याहून महत्त्वाची बाब म्हणजे, उपनगराध्यक्ष दत्तात्रय बनकर यांची या प्रक्रियेत अवहेलना झाल्याची भावना पालिका वर्तुळात व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्यात समन्वय अपेक्षित असताना, अशा प्रकारच्या घडामोडींमुळे सत्ताधारी गटात सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चांना आणखी खतपाणी मिळत आहे.
सातारा नगरपालिकेत मागील काही महिन्यांपासून विविध निर्णय, स्थायी समितीतील घडामोडी, अंतर्गत मतभेद आणि प्रशासकीय कामकाजावरून सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. आता प्रोसिडिंगवरील सहीचा मुद्दा समोर आल्याने या वादात आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे.
या संपूर्ण प्रकरणात नेमकी प्रक्रिया काय पाळण्यात आली? उपनगराध्यक्षांना विश्वासात घेण्यात आले होते का? इतिवृत्तातील नोंदींची सविस्तर पडताळणी करण्यात आली होती का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्या बारकाईने आर्थिक कागदपत्रांवर सही केली जाते, तीच दक्षता सभेच्या अधिकृत प्रोसिडिंगवर का दिसली नाही? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
या घडामोडींमुळे सातारा शहरात एकच चर्चा सुरू झाली आहे—”सातारा पालिकेत नेमकं चाललंय तरी काय?” नागरिकांमध्येही पालिकेच्या निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता, नियमांचे पालन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय राखला जात आहे का, याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

Adv