सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीवरील स्थगिती अखेर उठविण्यात आली असून, त्यानंतर तत्काळ नियुक्ती आदेशही वितरित करण्यात आल्याने जिल्ह्यात राजकीय चर्चांना जोर आला आहे.
विशेष म्हणजे, सातारा–सांगली विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली होती.का अशी शंका उपस्थितीत होत आहे स्थगिती उठवून नियुक्ती आदेशांचे वितरण सुरू झाल्याने या निर्णयामागे केवळ प्रशासकीय कारणे होती की राजकीय गणित यावर आता चर्चा रंगली आहे.
भरती प्रक्रिया थांबविण्याचा निर्णय आणि त्यानंतर अचानक स्थगिती उठविण्याची वेळ यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निवडणुकीपूर्वी भरतीला स्थगिती आणि निकालानंतर तत्काळ नियुक्ती आदेश, या घडामोडींमुळे “भरतीचा निर्णय निवडणुकीशी जोडला गेला होता का?” असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, स्थगिती उठताच नियुक्ती आदेश वितरित झाल्याने संपूर्ण प्रक्रिया आधीपासूनच पूर्ण झाली होती का, अशीही चर्चा सुरू झाली आहे. यामुळे जिल्हा बँकेच्या कारभारासह आगामी बँक निवडणुकांच्या राजकारणालाही नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणावर बँक प्रशासन किंवा संबंधित पदाधिकाऱ्यां कडून अधिकृत भूमिका काय मांडली जाते, तसेच विरोधक या मुद्द्यावर कोणती भूमिका घेतात, याकडे आता सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






