सातारा: शहरातील नियोजन सभापतींच्या अतिक्रमणविषयक कारवायांनंतर आता राजकीय वर्तुळात एका नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. सभापतींना “राजकीय विक्रमवीर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका प्रभावशाली सल्लागाराचा हात असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
निनावी पत्राच्या आधारे बोगदा परिसरातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आल्यानंतर काही भागात तत्काळ अतिक्रमण हटविण्यात आले, तर इतर काही ठिकाणी मात्र कारवाईला वेग न मिळाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर निर्णय प्रक्रियेवर कोणाचा प्रभाव आहे, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.स्थानिक नागरिकांमध्ये या कारवाईबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असून,काही सुजाण नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेत अतिक्रमण काढून टाकल्या चेही दिसून आले प्रशासनाच्या कारवाईपूर्वीच काही ठिकाणी लोकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण हटवल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
मात्र या संपूर्ण कारवाईवर आता शहरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. “एका ठिकाणी कठोर कारवाई आणि इतर काही भागांकडे दुर्लक्ष का?” असा सवाल स्थानिक नागरिकां कडून उपस्थित केला जात आहे. विशेषतः विक्रम वीरांच्या सल्ल्याने काही भागातील अतिक्रमणांना नियोजन सभापतींनी बगल दिल्याचीही चर्चा शहरात रंगली आहे.
“राजकीय विक्रमवीर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सल्लागाराच्या सल्ल्यानुसार काही ठिकाणी कारवाईला दिशा मिळाल्याची आणि काही ठिकाणी ती थांबविण्यात आल्याचीही चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
दरम्यान, नियोजन सभापतींना नेमका सल्ला कोण देतो आणि अतिक्रमण कारवाईचे निकष काय आहेत याबाबत प्रशासना कडून स्पष्ट भूमिका अपेक्षित आहे.या संपूर्ण प्रकरणामुळे शहरातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.






