पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच सगळ्यांनी सर्व बाबतीत बचतीचा मार्ग अवलंब करावा असे आवाहन केले आहे. सर्वसामान्याबरोबरच लोकप्रतिनिधींनी बचतीचा मार्ग अवलंब करणे गरजेचे आहे. ताफ्याचा त्याग करुन, इलेक्ट्रीक वाहन वापरणे याबरोबरच आर्थिक बचतीसाठी आजी-माजी लोकप्रतिनिधींनी स्वच्छेने निवृत्तीवेतनाचा त्याग करुन समाजापुढे आदर्श ठेवणे गरजेचे आहे. आजी-माजी लोकप्रतिनधींच्या निवृत्तीवेतनावर कोट्यवधी रुपये खर्च होत असून तो खर्च थांबल्यास राज्याच्या विकासाला हातभार लागेल. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी निवृत्तीवेतनाचा त्याग करावा असे आवाहन सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
लोकप्रतिनिधींना दिलेल्या पत्रात, मतदारसंघाच्या विकासासाठी आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी करत असलेल्या कार्याबद्दल आम्हाला आदर आहे. एक जागरूक नागरिक म्हणून, आपल्या निदर्शनास एक अत्यंत महत्त्वाचा विषय आणून देण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. सध्याच्या आर्थिक काळात सामान्य जनता महागाई आणि अनेक आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. लोकशाहीत लोकप्रतिनिधी म्हणून आपले कार्य हे सेवेचे माध्यम आहे. मात्र, सध्या लोकप्रतिनिधींना (आमदारांना) मिळणारे निवृत्तीवेतन आणि प्रत्येक कार्यकाळ पूर्ण झाल्यावर त्यात होणारी भरघोस वाढ हा चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरत आहे. राज्याच्या तिजोरीवर हा एक मोठा आर्थिक भार आहे.
माझी आपणास नम्र विनंती आहे की, आपण एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून स्वेच्छेने आपली पेन्शन घेण्याचे टाळावे किंवा ती नाकारावी. आपल्यासारख्या लोकप्रतिनिधींनी जर हा पुढाकार घेतला, तर त्यातून वाचणारी रक्कम राज्यातील आरोग्य, शिक्षण, किंवा गरिबांच्या कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांसाठी वापरता येईल. हे केवळ एका आर्थिक निर्णयापुरते मर्यादित न राहता, समाजासमोर एक मोठे ‘त्यागाचे आणि निष्ठेचे’ उदाहरण निर्माण करेल.
लोकसेवेचा मार्ग निवडलेल्या लोकप्रतिनिधींनी, राज्याच्या हितासाठी असा निर्णय घेणे ही काळाची गरज आहे आणि ती जनतेच्या हिताचीही ठरेल. आपण या विषयावर गांभीर्याने विचार करून असा सकारात्मक निर्णय घ्यावा, ही तमाम नागरिकांच्या वतीने आपल्याला कळकळीची विनंती आहे. आपल्याकडून या विनंतीवर सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी मला खात्री आहे, असे लिहिले आहे. आता या पत्राला लोकप्रतिनिधींचा प्रतिसाद मिळेल हे बघणे औत्युसक्याचे ठरणार आहे.
चौकट
मंत्री शिवेंद्रसिंहराजेपासून सुरुवात
आजी-माजी लोकप्रतिनिधींनी स्वेच्छेने निवृत्तीवेतनाचा त्याग करावा अशी मागणी करणारे निवेदन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना देण्यात आले. निवेदन वाचल्यानंतर त्यांनी मी मंत्रीपद स्वीकारल्यापासूनच गाड्याचा ताफा कमी केला असून बॉडीगार्डचा सुध्दा त्याग केलेला आहे. जनतेच्या सेवेसाठी कायम उपलब्ध असून जनतेच्या हिताचा विचार कायम असतो. स्वेच्छेने निवृत्तीवेतनाबाबत नक्की विचार करु असे आश्वासनही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.






