जातीवादी पक्षाच्या हातात जिल्हा परिषदेची सत्ता द्यायची नाही असे मंत्री मकरंद पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितले होते आता त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक घनश्याम चक्के चक्क भाजपच्या मदतीने उपनगराध्यक्ष झाले असल्याने मकरंद आबांच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे
सातारा:वाई येथे भाजपच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे घनश्याम चक्के उपनगराध्यक्ष झाले. स्वीकृत नगरसेवक भाजपचे सचिन जगन्नाथ सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शब्बीर पठाण यांची निवड करण्यात आली.कामकाजातील संघर्ष टाळण्यासाठी विषय समित्या प्रत्येकी सहा नगरसेवकांच्या करण्यात आल्या. उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर घनश्याम चक्के यांनी मी मकरंद पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक असून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. शहर विकासासाठी मी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितल्याने या निवडी मागे नक्की काय राजकारण आहे. याविषयीची चर्चा शहरात सुरू आहे.
आज पालिकेच्या सभागृहात नवनिर्वाचित नगरसेवकांची उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक निवड आणि विषय समित्या ठरवण्यासंदर्भात
नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बैठक झाली. यावेळी मुख्याधिकारी संजीवनी दळवी उपस्थित होत्या.
वाई पालिकेची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक झाली आहे. या निवडणुकीत भाजपाचे अनिल सावंत हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. भाजपाचे दहा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे बारा आणि एक अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे.
उपनगराध्यक्ष निवडीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे घनश्याम चक्के, अपक्ष सुशील खरात आणि भाजपाचे विजय ढेकाने यांनी अर्ज भरला होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत विजय ढेकाने यांनी आपला अर्ज मागे घेतला. यानंतर झालेल्या निवडीच्या वेळी घनश्याम चक्के आणि सुशील खरात यांना बारा बारा समसमान मते मिळाली. यामुळे नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी आपला अधिकार वापरून घनश्याम चक्के यांच्या पारड्यात आपले मत दिले. त्यामुळे घनश्याम चक्के यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड झाली. अपक्ष नगरसेवक सुशील खरात यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नगरसेवकांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे घनश्याम चक्के यांना भाजपाच्या नगरसेवकांनी मतदान केले. त्यामुळे भाजपाच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे उपनगराध्यक्ष म्हणून घनश्याम चक्के यांची निवड झाली.
निवडीनंतर नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
पालिकेच्या कामकाजातील संघर्ष टाळण्यासाठी विषय समित्या प्रत्येकी सहा सदस्यांच्या करण्यास सदस्यांनी मंजुरी दिली
स्वीकृत नगरसेवक म्हणून राष्ट्रवादीचे शब्बीर पठाण आणि भाजपाचे सचिन सावंत यांची निवड करण्यात आली. भाजपाच्या मदतीने राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष झाल्याची माहिती शहरात पसरताच वेगवेगळ्या चर्चांना जोर आला होता. नंतर त्यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती.
चौकट
मी मकरंद पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक आहे. शहर विकासासाठी मी हा निर्णय घेतला आहे.राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती आहे. त्याप्रमाणे वाई येथे सुद्धा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहर विकासात कोणतीही अडचण येणार नाही.
घनश्याम चक्के, उपनगराध्यक्ष, वाई.






