मराठी माणसाचा मानबिंदू आणि स्वराज्य संस्थापक असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रनिर्मितीसाठी प्रेरणा देणारा इतिहास हा खरोखरच सर्व पिढ्यांसाठी आदर्श असा आहे .छत्रपतींचा हा इतिहास मराठी चित्रपटातून सादर करण्याचे आव्हान दिग्पाल लांजेकर यांच्यासारख्या मराठी चित्रपट दिग्दर्शकाने उचलले आणि केवळ दोन ते तीन तासात हा इतिहास समाजापुढे न मांडता तब्बल आठ चित्रपट निर्माण करण्याचे उचललेले शिवधनुष्य हे खरोखरच नव्या पिढीला प्रेरणादायी आहे ,असे उद्गार राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी काढले.
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शेर शिवराज या मराठी चित्रपटाच्या ऐतिहासिक पोस्टरचा उद्घाटन सोहळा सातारा येथील जलमंदिर पॅलेस मध्ये मान्यवर निमंत्रितांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला .या पोस्टर उद्घाटनप्रसंगी राजमाता श्री.छ.कल्पनाराजे भोसले यांनी वरील उद्गार काढले .
या कार्यक्रमास ..शेर शिवराज.. या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका करणारे सुप्रसिद्ध मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर , पावनखिंड मधील बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका करणारे अजय पुरकर, समीर धर्माधिकारी विक्रम गायकवाड यांचे सोबत चित्रपट निर्माते प्रद्योत पेंढारकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
शेर शिवराज’ चित्रपटाची टीम साताऱ्याला प्रमोशनसाठी आली असता या भेटीचा योग जुळून आला. ‘पावनखिंड’ हा चित्रपट पाहिल्यानंतर छत्रपती उदयनराजे यांनी राजमाता कल्पनाराजे भोसले यांना हा चित्रपट पाहण्यासाठी आग्रह केला. हा चित्रपट पाहिल्यानंतर राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या डोळयासमोर समग्र इतिहास उभा राहत तो अभिमानाने जागृत झाला. ‘शेर शिवराज’ चित्रपटाला मनापासून शुभेच्छा देत त्यांनी कलाकारांचे भरभरून कौतुक केले. चित्रपटाच्या चित्रीकरणाचे अनुभवही कलाकारांकडून जाणून घेतले.
शेर शिवराज हा मराठी चित्रपट येत्या 22 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित केला जात आहे .त्यापूर्वी शिवछत्रपतींचा इतिहास आणि त्यासाठी आम्हाला हवी असलेली शाबासकीची थाप खुद्द राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी या कार्यक्रमातून दिली हे खरोखरच आम्हा सर्वांचे भाग्य आहे. आजपर्यंत तीन चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर शेर शिवराज व त्यापुढे आणखीन चार चित्रपट निर्माण करण्याचे शिवराज अष्टक हे आठ चित्रपटांचे संकल्पित काम राजमाता यांच्या आशीर्वादाने निश्चित पूर्ण होईल असे यावेळी दिगपाल लांजेकर यांनी बोलताना सांगितले .
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे सुप्रसिद्ध मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी हे शिवरायांचे ऐतिहासिक चित्रपट नव्या पिढीला पाहण्यासाठी आमच्या सर्व टीमने घेतलेले परिश्रम हे खरोखरच आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे यशस्वी होत आहेत छत्रपतींच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम आणि त्यांची ओळख या चित्रपटातून होत आहे आपला इतिहास किती गौरवशाली आहे हे दाखवण्याचा या चित्रपटांचा मूळ हेतू असून करमणूक नसून केवळ राष्ट्राभिमान जागृत करणारी ही ऐतिहासिक चित्र कृती सर्वांनाच आवडेल शेर शिवराज या चित्रपटात अफजलखान वधाचा प्रसंग साकारला गेला आहे तो सर्वच प्रेक्षकांना पहायला आवडेल असे यावेळी उपस्थितांना सांगितले.
मागील महिन्यात नुकताच प्रदर्शित झालेला पावनखिंड हा चित्रपट मी स्वतः जाऊन पाहिला त्यातील कलाकारांनी केलेले उत्कृष्ट काम व आपण सर्वांनी उभारलेला शिवचरित्राचा इतिहास हा खरोखरच सर्वांना आवडणारा आणि प्रेरणा देणारा आहे अशा शब्दात राजमातांनी सर्वांचे कौतुक केले
या कार्यक्रमात सर्व मान्यवर कलाकारांचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन राजमाता यांच्या हस्ते करण्यात आला शेर शिवराज चित्रपट कलाकारांच्या वतीने ही राजमाता यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा शुभम घटनेतून बनविलेला आकर्षक जिरेटोप स्मृतिचिन्ह म्हणून भेट देण्यात आला याप्रसंगी सातारा जिल्हा परिषद शिक्षण समिती माजी सभापती सुनील काटकर, नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती वसंत शेठ जोशी, सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि नृत्य दिग्दर्शक पंकज चव्हाण (सातारा सांस्कृतिक बीजेपी प्रकोष्ट प्रदेश उपाध्यक्ष) , पत्रकार दीपक प्रभावळकर, अतुल देशपांडे तसेच, अभिजीत भोसले, सौरभ सुपेकर (वाडयातील समस्त), सह्याद्री प्रतिष्ठानचे प्रदीप गोजमगुंडे, रोहित सावंत आदि मान्यवरही यावेळी उपस्थित होते.






