Wednesday, April 22, 2026
spot_img
Home Satara District Satara City गुडगुडी बाबाला मिळाला यवतेश्वरच्या घाटात चोप मद्यधुंद अवस्थेतल्या कर्मचाऱ्यासाठी पालिकेची गाडी दिमतीला...

गुडगुडी बाबाला मिळाला यवतेश्वरच्या घाटात चोप मद्यधुंद अवस्थेतल्या कर्मचाऱ्यासाठी पालिकेची गाडी दिमतीला प्रशासनाने ठेवले मात्र कानावर हातं

121
Adv

सातारा पालिकेच्या गुडगुडी बाबाची राजकीय मस्ती शनिवारी यवतेश्वरच्या घाटात उतरली . पालिकेच्या वाहनाने कासवरून माघारी येणाऱ्या मद्यधुंद अवस्थेतल्या या गुडगुडी बाबाला किरकोळ कारणावरून उद्भवलेल्या भांडणातून एका तळ्यावरच्या युवकांनी चोप दिला . रात्री साडेआठ पर्यंत साताऱ्यात हे सुरू असलेल्या या बेताल नाटयाची पालिका प्रशासनाला गंधवार्ताही नव्हती .

सातारा शहरातील करोना प्रतिबंधाची मोठी जवाबदारी सातारा पालिकेच्या आरोग्य विभागावर आहे . या विभागाचा लाडावलेला आरोग्य निरीक्षक याचा राजकीय मस्तवालपणा दाखवणारा आणखी एक किस्सा शनिवारी उघड झाला . आधी दुबई वारी मग क्वारंटाईन नियमाचा भंग, नंतर आरोग्य विभागाशी हुज्जत, पालिकेतल्या अधिकाऱ्यांच्या टक्केवारीची रेकॉर्ड सीडी, या गुडगुडी बाबाने चुकांची कर्मदरिद्री अक्कल तरी किती पाजळावी . शनिवारी पुन्हा पालिकेच्या आरोग्य विभागाची अब्रू चव्हाट्यावर टांगण्यात त्यांनी कोणती कसर ठेवली नाही . दुपारनंतर कास मार्गवरील निसर्गरम्य परिसरात गुडगुडी बाबा बैठकीतल्या मित्रांसह मेजवानीसाठी गेले होते . आता नसलेल्या कामाचा ताणच इतका आहे की श्रमपरिहार तो बनतोच . मेजवानी उरकल्यावर गुडगुडी बाबांने पालिकेच्या परिवहन विभागाने भाड्याने घेतलेली व्हाईट कलरच्या तवेरा गाडी चालकाला फोन केला . मात्र गाडीमालकाने उशिरा गाडी कास परिसरात नेण्यास नकार दिल्यावर गुडगुडी बाबाची मद्यधुंद अवस्थेत तुला माहित आहे का मी कोण ? या शब्दात मिजास चालू झाली . कसबसं प्रकरण शांत होऊन तवेरा चालकाने गुडगुडी बाबाला गाडीत घालून माघारी आणले तर यवतेश्वरच्या घाटात त्यांची साताऱ्यातील एका तळ्यावरच्या युवकांशी बाचाबाची झाली . तेव्हा संतापलेल्या युवकांनी घाटातच गुडगुडी बाबाला चांगलाच चोप देत त्याचे चंद्रावर गेलेले विमान जमिनीवर आणले . घाटात सामसूम होती मात्र माहिती ला पाय फुटले आणि ही ब्रेकिंग न्यूज सातारा नामाच्या हाती पडली . गुडगुडी बाबाच्या मिजास खोर आणि हेकट वागण्याच्या नाट्याचा सातारा नामाने पुन्हा एकदा पर्दाफाश केला .

चौकट –

प्रशासनाने ठेवले पुन्हा कानावर हात

गुडगुडी बाबाच्या अगाध राजकीय लीला या चौकटी बाहेरच्या असल्याने त्या पचवताना पालिका प्रशासनाचा जीव घाबराघुबरा होतो . पालिकेच्या परिवहन विभागाची गाडी प्रशासनाच्या परवानगी शिवाय बाहेर कशी गेली ? हा प्रश्न ओघाने उपस्थित होतो . गुडगुडी बाबांच्या या रंगीत कार्यक्रमाची ना मुख्याधिकाऱ्यांना कल्पना होती ना आरोग्य विभागाचे प्रमुख असणाऱ्या उपमुख्याधिकाऱ्यांना . प्रशासनाने या प्रकरणी पुन्हा एकदा कानांवर हात ठेवले . प्रशासनात लाडावलेल्या बाळावर कठोर कारवाई करा अन्यथा धुमाळ साहेब या बेताल आरोग्य निरिक्षकाला आवरा अशी सातारकरांची अपेक्षा आहे . म्हातारी मेल्याचं दुःख नाही गुडगुडी बाबाच्या निमित्ताने काळ सोकावतोय हे दुर्दैव आहे .

Adv