महात्मा जोतीबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेचा शासन निर्णय संबंधित विभागाला प्राप्त झाला असून या शासन निर्णयाच्या निकषानुसार एकही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. यादी तयार करताना महसूल, कृषि, सहकार विभागाने यादी 3 ते 4 वेळा चेक करावी, अशा सूचना राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज केल्या.
कराड येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या वेळी ते बोलत होते. या बैठकीला प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अमरदिप वाकडे, पोलिस उपनिरीक्षक सूरज गुरव, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार निधी, जिल्हा वार्षिक योजना निधीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अशी कामे आठ दिवसाच्या आत सुरु करा. विशेषकरुन सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधकामाची कामे सुरु करावीत व कामांचा अहवाल वेळोवेळी देण्यात यावा.
अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचा निधी प्राप्त झाला आहे व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या निधीसाठी पाठपुरावा करावा. अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या, यावेळी या बैठकीत तालुकास्तरीय विभाग प्रमुखांनी राज्यमंत्री श्री. देसाई यांना आपला परिचय करुन दिला. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित व लोकप्रतिधिीही उपस्थित होते.