सातारा पालिकेचे युवा व लोकप्रिय उपनगराध्यक्ष मनोज शेंडे सत्काराच्या हार तुऱ्यांचा सोस बाजूला ठेऊन प्रत्यक्ष कामाला लागले आहेत . शहराची हद्दवाढ जाहीर झाल्यानंतर जो भाग नव्याने हद्दीत आला आहे त्या भागाची सफाई मोहिम पालिकेने हाती घेतली असून उपनगराध्यक्ष व आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांनी या मोहिमेला संयुक्तरित्या गती दिली आहे .
सातारा शहराची हद्दवाढ जाहीर होऊन सुमारे पावणेदोन महिने उलटत आले . नवीन हद्दवाढीत ज्या ग्रामपंचायतींची क्षेत्र पालिकेत विलिन झाली तेथील मालमत्ता व कर्मचारी यांच्या सेवा पालिकेकडे वर्ग करण्याच्या कामाला गती आली आहे . हद्दवाढीच्या नवीन क्षेत्रात अद्यापही कोणत्याही कामांना सुरवात झाली नाही . नवीन उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर स्वीकृत नगरसेवकांची निवड व पदवीधर शिक्षक मतदारसंघाची लागू झालेली आचारसंहिता यामुळे धोरणात्मक ठराव आणि विकास कामांना प्रचंड मर्यादा आल्या आहेत . उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी या अडचणी ओळखून हद्दवाढीच्या नव्या भागात प्रत्यक्ष सफाई मोहिमेवर भर दिला आहे . नवीन हद्दवाढीतला भाग हा साधारण अठरा किलोमीटरचा असून ग्रामपंचायतींच्या विलिनीकरणामुळे येथे पायाभूत सुविधांसह स्वच्छतेची कामे ठप्प झाली आहे . उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी या अडचणी ओळखून आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक आणि जादा ट्रॅक्टरची कुमक येथे तैनात केली आहे . उपनगराध्यक्षांनी सर्वप्रथम शाहू चौक ते चार भिंती रस्ता साफ केल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी प्रशस्त झाला आहे . करंजे गावठाणातही दहा घंटा गाडया व साठ आरोग्य कर्मचारी घेऊन उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व अशोक घोरपडे सफाई अभियानामध्ये उतरले . शहराचे पश्चिम प्रवेशद्वार असणाऱ्या वर्ये पुलानजीकचा रस्ता पालिकेने साफ केला . सफाई मोहिमेसाठी ट्रॅक्टर फिरवण्याचे नियोजन आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य विभाग प्रमुख सुहास पवार यांनी तयार ठेवले आहे . मात्र अद्याप हद्दवाढीनंतरची जादा यंत्रणा पालिकेकडे अद्याप वर्ग न झाल्याने तांत्रिक अडचणी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले . हद्दवाढीच्या नवीन भागात पालिका कामाच्या दृष्टीने सक्रीय झाल्याचा संदेश नागरिकापर्यंत गेला आहे . सातारा शहरात दररोज चाळीस ते बेचाळीस टनं कचरा उचलला जातो . हद्दवाढीमुळे 61 हजार लोकसंख्येची भर पडल्याने कचरा संकलन सुध्दा बारा ते पंधरा टनांनी वाढले आहे . त्याचाही होमवर्क केला जात असल्याचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी सांगितले