एक तपानंतर सरदार पुन्हा पालिकेत? स्वीकृत सदस्यपदी ढेकणे निश्चित?

79
Adv

सातारा पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीसाठी मंगळवार, दि. 29 रोजी दुपारी तीन वाजता विशेष सभा ऑनलाइन होणार आहे. या पदावर शेवटच्या दहा महिन्यांसाठी साविआकडून माजी नगरसेवक बाळासाहेब ढेकणे उर्फ सरदार व वसंत जोशी यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता आहे. हे दोघेही खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय आहेत.

बाळासाहेब ढेकणे हे करंजेतील रहिवासी असून त्यांचे कार्यकर्त्यांचे जाळे आहे. मागील कार्यकाळात त्यांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी देण्यात आली होती; आता एक तपानंतर म्हणजेच बारा वर्षानंतर पुन्हा बाळासाहेब ढेकणे नगरसेवक होणार असल्याचे समजते.. वसंत जोशी यांचा सामाजिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग असतो. खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना भेटून त्यांनी इच्छा व्यक्त केली होती?. या निवडीसह विकासकामांबाबत निर्णय घेताना उदयनराजे यांना यापुढे राजकीय दक्षता घ्यावी लागणार आहे.

विषय समित्यांच्या निवडीत लागणार कस

पालिकेच्या काही विषय समित्यांच्या सभापतींवर निष्क्रियतेचा ठपका आहे. त्यांच्या कामावर प्रचंड नाराजी असून प्रसारमाध्यमांनी काही बाबी उदयनराजेंपुढे स्पष्ट केल्या होत्या. त्यामुळे शेवटच्या दहा महिन्यांसाठी ताज्या दमाचे व जनहिताची काळजी घेणारे सभापती उदयनराजेंनी काळजीपूर्वक निवडावेत, अशी अपेक्षा आहे. विद्यमान सभापतींची मुदत 4 जानेवारीला संपत असून या पदांसाठी अनेकांनी बाह्या सरसावल्या आहेत.

स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार, दि. 28 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे नामनिर्देशनपत्रे दाखल करणे, मंगळवार, दि. 29 रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत अर्जांची छाननी व पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षांकडे अर्ज पाठविणे, त्याच दिवशी दुपारी 3 वाजता स्वीकृत नगरसेवक निवडीची घोषणा करणे. या सभेसाठी नगराध्यक्ष पालिकेच्या छ. शिवाजी सभागृहात उपस्थित राहणार आहेत.

Adv