सातारा पालिकेच्या मंगळवारी ऑनलाईन झालेल्या विशेष सभेत सातारा विकास आघाडीच्या रिक्त कोट्यातील स्वीकृत नगरसेवकपदी बाळासाहेब ढेकणे यांची निवड झाली . पीठासन अधिकारी नगराध्यक्ष माधवी कदम यांनी या नावाची घोषणा केली .
या निवडीनंतर करंजे भागातील ढेकणे समर्थकांनी फटाके वाजवून जल्लोष केला . सातारा विकास आघाडीचे बावीस नगरसेवक पालिकेत असल्याने त्यांच्या वाट्याला दोन स्वीकृत नगरसेवक पदे आली आहेत . पैकी प्रशांत अहेरराव यांच्या राजीनाम्याने एक पद गेल्या काही महिन्यापासून रिक्त राहिले होते . मात्र आधी पदवीधर शिक्षक विधानसभा मतदारसंघ नंतर ग्रामपंचायत निवडणुकीची जिल्ह्यात लागू झालेली आचारसंहिता यामुळे या निवडींवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते . मात्र या निवडी होण्यास कोणतीही हरकत नसल्याच्या मार्गदर्शक सूचना निवडणूक आयोगाने दिल्याने या निवडींचा मार्ग मोकळा झाला . सोमवारी बाळासाहेब ढेकणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून घेणे व त्याची छाननी या प्रक्रिया उपविभागीय अधिकारी सातारा यांनी पार पाडल्या . मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजता पीठासन अधिकारी नगराध्यक्ष माधवी कदम यांना ऑनलाईन सभेमध्ये ढेकणे यांच्या अर्जाचा एकमेव बंद लखोटा प्राप्त झाला . हा लखोटा फोडून नगराध्यक्ष माधवी कदम यांनी स्वीकृत नगरसेवकपदी बाळासाहेब ढेकणे यांची निवड झाल्याचे जाहीर केले .
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पालिकेच्या प्रवेश द्वारावर बाळासाहेब ढेकणे यांचे विशेष अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . नगराध्यक्ष माधवी कदम , उपनगराध्यक्ष मनोज शेंडे , स्वीकृत नगरसेवक अॅड दत्ता बनकर तसेच सर्व सभापतींनी ढेकणे यांचे या निवडी बद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले . या निवडीनंतर ढेकणे समर्थकांनी पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वारा समोर फटाक्यांची आतिषबाजी करत एकच जल्लोष केला . उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्यानंतर बाळासाहेब ढेकणे यांच्या निमित्ताने करंजे भागाला पुन्हा प्रतिनिधित्व मिळाल्याने समर्थकांनी उदयनराजे भोसले यांचे आभार मानले .
प्रतिक्रिया
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी माझ्यावर जी कामाची जवाबदारी सोपविली आहे ती अत्यंत विश्वासाने पार पाडेल . करंजे भागातील प्रश्नांसाठी व लोकांच्या विविध कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल . नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या सहकार्याने करंजे ग्रामीण भागाचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी निधी कसा उपलब्ध होईल यासाठी निश्चित प्रयत्न करणार आहे .
बाळासाहेब ढेकणे
स्वीकृत नगरसेवक , सातारा नगरपरिषद सातारा .