पिंपोडे बुद्रुक प्रतिनिधी…
प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि सातारा ही सातारा जिल्ह्यातील सहकारी बँकात नावलौकिक मिळवलेली एक बँक आहे. या बँकेबाबत समाजातही अजून चांगली प्रतिमा आहे. अनेक शिक्षक सभासदांचे संसार या बँकेच्या अर्थसहाय्यातून उभे राहिले आहेत. परंतु या बँकेच्या मागे लागलेला बोगस कर्ज प्रकरणांचा ससेमिरा अजूनही चालूच आहे.
मागील काही दिवसात कराड शाखेतील नियमबाह्य कर्ज प्रकरणाचा पर्दाफाश शिक्षक समितीच्या संचालकांनी अचानक भेटीवेळी केला होता. त्याबाबतची लेखी तक्रारही मा.जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली आहे. तदनंतर सातारा शाखा तपासणीत चक्क विद्यमान चेअरमन यांनीच नियमबाह्य कर्ज प्रकरण केल्याचे लक्षात आले. सातारा शाखेतील कर्जांचे रोखे तपासत असताना विद्यमान चेअरमन यांनी खोटे दस्तऐवज सादर करून बँकेची फसवणूक केल्याचे आढळले. पगाराचे खोटे दाखले सादर करून ६० लाख रुपये कर्जाचा लाभ चेअरमन यांनी घेतलेला आहे. दिनांक ११डिसेंबर २०२० ची सर्व कर्ज प्रकारातील विद्यमान चेअरमन यांची बँकेला येणे रक्कम तब्बल ६३ लाख २५ हजार ३४१ रुपये इतकी प्रचंड प्रमाणात असल्याचे पाहणीत आढळले.
एक महिन्यापूर्वी बँकेची कर्ज मर्यादा ६० लाख रुपये होती. मग यांच्याकडे असणारी ६३ लाख २५ हजार ३४१ रुपये येणे बाकी कोणत्या नियमात बसली? बँकेच्या प्रमुख पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने सर्व नियम पायदळी तुडवले तरी चालतील असेच याला म्हणावे लागेल. नियम करणारे यांचीच कर्ज मर्यादेचे उल्लंघन केले आहे. सभासदांचा एखादा कागद राहिला असेल तरी त्याला कर्ज मिळत नाही.मग विद्यमान चेअरमन यांनी पदाचा गैरवापर करून कर्मचाऱ्यांच्या वर दबाव आणूनच ही कर्ज प्रकरणे केल्याचे निष्पन्न होत आहे . गत संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये कोणताही विषय आलेला नसताना व कोणालाही विचारात न घेता कर्जमर्यादा ६० लाखावरून ६२ लाख केली. ती केवळ स्वतःसाठीच केली हे आज यावरून स्पष्ट होते.
विद्यमान चेअरमन यांची नेमणूक ७/८/१९९२ असून यावेळी लागलेल्या शिक्षकांचा पगार साधारणपणे ७८ हजार असा आहे. परंतु त्यांनी दिनांक ३०/१२/२०१९ रोजी सादर केलेल्या पगार दाखल्यात ९४,७२०/- रुपये पगार दाखविला आहे. यामध्ये कपाती केवळ २८२० इतक्याच आहेत. गमतीची बाब म्हणजे तदनंतर दिनांक २१/९/२०२० रोजी केलेल्या कर्ज प्रकरणाचा पगार दाखला केवळ ९२,५००/- रुपयांचा आहे. म्हणजेच विद्यमान चेअरमन यांचा पगार पुढील वर्षी वाढण्याऐवजी २,२२० रुपयांनी कमी झाला. केवढी ही पगारातील तफावत व सादर केलेल्या माहितीतील दिशाभूल!
त्यांच्या पगारात ६० लाख रुपये कर्ज कसे बसले हाच मोठा संशोधनाचा विषय आहे. ६० लाख रुपये कर्ज काढण्यासाठी कोणत्याही कर्जदाराचा पगार कमीत कमी एक लाख रुपये तरी असायला हवा असे बँकेतील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.परंतु विद्यमान चेअरमन यांचा पगार ७८ हजार असून बँकेची कपात पगार पत्रकात केवळ ६००/- इतकी आहे.मग पगारातून कपात करून कर्ज हप्ते भरणेचा नियम चेअरमन यांना नाही का?
बँकेच्या प्रमुख पदावर असणाऱ्या व्यक्तीनेच अशी नियमबाह्य खोटे दस्तऐवज सादर करून कर्ज काढले असेल तर बँके चा कारभार कोणत्या थराला जाऊन पोहोचला आहे हे सर्वसामान्य स्वतःला वेगळे सांगायला नको.
“तळे राखील तो पाणी चाखील” अशी एक जुनी म्हण ऐकली होती. परंतु इथे पाणी चाखण्याऐवजी तळेच गिळंकृत करण्याचा प्रकार पुढे आला आहे.
याबाबत मागील बोगस कर्ज प्रकरणे व या बरोबरच विद्यमान चेअरमन यांच्या सर्व कर्ज प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी शिक्षक समितीचे संचालक श्री किरण यादव,श्री शिवाजी शिंदे,श्री चंद्रकांत मोरे,श्री सुभाष शेवाळे यांनी केली आहे.निःपक्षपाती पणे चौकशी न झाल्यास मा सहकार आयुक्त पुणे यांची भेट घेऊन शिक्षक बँकेचे “स्पेशल ऑडिट” करण्याची मागणी करणार असल्याचे यावेळी समितीच्या संचालकांनी सांगितले.