सातारा पालिकेतील हजेरी नोंदवण्याची बायोमेट्रिक यंत्रणा बंद पडल्याने बहुतांश विभागांचे कर्मचारी दुपारी चारनंतर गायब होऊ लागले आहेत. त्यामुळे दैनंदिन कामाचा खोळंबा होऊन विभागीय बैठकांमध्ये प्रलंबित कामांचा निपटारा होईनासा झाला आहे. या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
राज्य शासनाने पालिका कर्मचाऱ्यांसाठीही पाच दिवसांचा आठवडा केला असला तरी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत वाढ केली आहे; परंतु सातारा पालिकेचे बहुतांश अधिकारी व कर्मचारी आपापले विभाग बंद करून सायंकाळी सहाच्या आतच घरी जात आहेत. उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी केलेल्या पाहणीत ही बाब उघड झाली आहे.
कामगार संघटनांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीनुसार राज्य सरकारने यावर्षी दि. 29 फेब्रुवारीपासून राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू केला; परंतु शासनाने कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजाच्या वेळेत 45 मिनिटांनी वाढ केली आहे. शिपाई वगळता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 अशी करण्यात आली आहे. शिपायांच्या कामकाजाची वेळ सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 अशी आहे.
सातारा पालिकेकडून प्रारंभीची काही महिने या वेळांचे काटेकोर पालन करण्यात आले. काही कर्मचारी आजही वेळेचे बंधन पाळतात; परंतु अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्याचा विसर पडला आहे. अनेक कर्मचारी पंधरा ते पंचवीस मिनिटे अगोदरच आपले कार्यालय बंद करून घराकडे निघून जातात.
लेखा विभाग वगळता करोना, आस्थापना, जन्म-मृत्यू, भांडार, वसुली आदी विभागांना सव्वासहा वाजण्यापूर्वी कुलपे लागलेली असतात. पाणी पुरवठा विभागाचे काही कर्मचारी सकाळी तोंड दाखवून गायब होतात. या लाडावलेल्या कर्मचाऱ्यांचा लवकरच बंदोबस्त करण्याचे संकेत प्रशासनाने दिले
आहेत.
*तसे खरे जेवणाची वेळ ही अर्धा तासच असते मात्र आपल्या पालिकेत दुपारी दीड ते साडेतीन अशी ऐतिहासिक वेळ पाळली जाते यावरही आळा बसला पाहिजे सर्वसामान्य माणूस दुपारच्या दरम्यान पालिकेत आला तर शुकशुकाट पाहायला मिळतो यावरही मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी तोडगा काढण्याची गरज आहे अशी अपेक्षा सर्वसामान्य सातारकर नागरिक करत आहेत