भाजपच्या कमळं चिन्हावर पुन्हा राजकीय भवितव्य आजमावणारे श्री छ उदयनराजे भोसले व श्री छ शिवेंद्रराजे भोसले राजकीय आखाड्यासाठी सज्ज झाले आहेत .पितृपंधरवड्याची अमावस्या संपल्यानंतर एकाच दिवशी दोन्ही राजे एकाच वेळी फॉर्म भरतील असे नियोजन जल मंदिर व सुरूची या सत्ता केंद्रावर सुरू झाले आहे .. सातारा विधानसभेसह लोकसभेची पोटनिवडणूक हा साताऱ्याच्या दोन्ही नेत्यांसाठी जिकिराचा मामला आहे . खासदार उदयनराजे भोसले हे अकरा दिवसापूर्वी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये आले तर शिवेंद्र राजे यांनी पाच महिन्यापूर्वीच भाजप प्रवेश केला . या दोन्ही राजांच्या प्रवेशाने साताऱ्यात कमळ फुलणार हा राजकीय तर्क खरा मानला जात असला तरी राष्ट्रवादीच्या घडयाळाची टिकटिक दोन्ही नेत्यांना स्वस्थ बसून देणारी नाही . उदयनराजे भोसले यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 1 लाख29 हजार मताधिक्कय मिळाले मात्र भाजपला तगडी टक्कर देताना 2014 च्या तुलनेत मताधिक्क्य 25 टक्क्यांनी घटले . 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवेंद्र राजे यांना 47 हजार मतांची आघाडी मिळाली मात्र सातारा शहरातील मतदानामध्ये मात्र घट झाली होती . या मतांची बांधणी विकास कामांच्या मुद्द्यावर कशी होईल हे पहावे लागणार आहे . सातारा शहराची हद्दवाढ, बोंडारवाडी धरणाची प्रशासकीय मान्यता, साताऱ्याचे वैद्यकीय महाविद्यालय, ग्रेड सेपरेटर, पन्नास कोटीचे काँक्रिट रस्ते या जुन्याच प्रकल्पांची जंत्री घेऊन नवमतदारांना साकडे घालावे लागणार आहे . दोन्ही राजांच्या जाहीरनाम्याची उत्सुकता नक्कीच राहणार आहे . चौकट- पितृपंधरवड्यानंतर खरी लगबग. साताऱ्यात दोन्ही राजे एकाच वेळी एकाच दिवशी भव्य शक्तीप्रदर्शनाने फॉर्म भरतील अशी जय्यत तयारी करण्याचा चंग राजे समर्थकांनी बांधला आहे . सध्या जलमंदिरवर गाठीभेटींचे सत्र सुरू झाले आहे . जाहीरनामे, व फलेक्स या घडामोडीमध्ये जवाबदारी निश्चित करण्याचा कार्यकर्त्याचा आग्रह आहे . भाजप पुणे महिला आघाडीच्या सदस्यांनी बुधवारी उदयनराजे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला . शिवेंद्रराजे यांनी तालुक्यातील दोनशे गावांपैकी महत्वाच्या आणि मोठया गटांमध्ये संपर्क अभियान सुरू ठेवले आहे . पहिल्या टप्प्यात कुडाळ, शेंद्रे व नागठाणे या तीन गटांवर शिवेंद्र राजे यांचे बारकाईने लक्ष आहे .पितृपंधरवडयानंतर रितसर मुहुर्तावर शकतीप्रदर्शनाने दोन्ही नेते एकदम च फॉर्म भरणार असल्याचे दोन्ही नेत्यांच्या संपर्क सूत्रांची माहिती आहे
. . खासदार व आमदार गटांची स्वतंत्रपणे तयारी सुरू झाली आहे . भाजपमध्ये एकत्र येण्याचा गोडवा साजरा झाला तरी मनोमिलनातल्या अंर्त मनाच्या तारा जुळलेल्या नाहीत . त्यामुळे भाजपचे दोन स्वतंत्र गट साताऱ्यात तयार झाले आहेत त्यात भाजपचे मूळचे सदस्य अद्यापही बाजूला आहेत . मात्र निवडणुकीत सर्व भाजप एकजिनसी दिसेल असा भाजपचे समर्थक सांगतात . मात्र प्रचाराची धोरणात्मक रणनीती ठरवताना मूळच्या भाजपच्या निष्ठावंतांना किती विश्वासात घेतले जाणार हा वादाचा मुद्धा आहे . त्यामुळेच साताऱ्यात मनोमिलनाचे चांगलेच त्रांगडे झाले आहे .