साताऱ्याच्या बहुचर्चित सातारा मेडिकल कॉलेजचे छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नामकरण करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने याबाबतचा अध्यादेश बुधवारी जाहीर केला. खासदार छ उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला यानिमित्ताने यश आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे उपसचिव प्रकाश सुरवसे यांच्या स्वाक्षरीने हा अध्यादेश प्रसारित करण्यात आला आहे
या अध्यादेशात नमूद आहे की 31 जानेवारी 2012 रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार सातारा येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नित 500 रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली होती . या कॉलेजच्या नामाधिकरण प्रस्तावाची बाब शासनाच्या विचाराधीन होती . या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे नाव छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सातारा असे करण्यात आले आहे . त्या अनुषंगाने आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई यांनी तात्काळ याप्रमाणे कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले आहेत . सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे .हा अध्यादेश साताऱ्याच्या जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, विभागीय आयुक्त पुणे, औषधी द्रव्य विभागाचे सहसचिव रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता यांना कळविण्यात आला आहे .
कृष्णानगर येथे सातारा मेडिकल कॉलेजची इमारतीचे काम सध्या जोरात सुरू आहे पहिल्या टप्प्यांमध्ये 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे .या वैद्यकीय महाविद्यालयाचे छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालय असे नामकरण करावे ही मागणी खासदार छ उदयनराजे भोसले यांनी केली होती .त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आरोग्य मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन सर्वप्रथम साताऱ्याच्या मेडिकल कॉलेजला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्यावे अशी मागणी केली होती .उदयनराजे भोसले यांनी दोन वर्षांपूर्वी करोनाच्या काळामध्ये केंद्रीय वैद्यकीय मंत्री भारती पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सुद्धा याबाबतचा पाठपुरावा केला होता या पाठपुराव्याला यश आले असून राज्य शासनाने वैद्यकीय संचालनालयाला पुढील कार्यवाही करायचे निर्देशित केले आहे . सातारा मेडिकल कॉलेजला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव दिले गेल्याबद्दल समाधानाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत .