कोरोना महामारी आणि लॉकडाऊन, अनलॉक, ब्रेक द चेन आदी उपाययोजनामधुन आज सामान्य व्यक्ती कुटुंब प्रचंड आर्थिक विवंचनेत आहेत. त्यामुळेच भारतातील गरीबातील गरीब जगला पाहीजे या उदात्त धोरणामधुन मे आणि जुन 2021 या दोन महिन्यांकरीता प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेमधुन प्रत्येक गरीब कुटुंबाला मोफत अन्नधान्य पुरवठा करण्याची घोषणा मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
या योजनेतुन सातारा जिल्हयासह महाराष्ट्रात मोफत अन्नधान्य पुरवठा विनासायास गरीबांपर्यंत पोचवण्या करीता प्रशासनाच्या बरोबरीने प्रसंगी एनजीओच्या सहकार्य घेवून सर्वकाही प्रयत्न केले जातील असे मत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.
जगाच्या पाठीवर माणुस हा एकमेव प्राणी आहे की ज्याला बुध्दी मिळालेली आहे. म्हणूनच आजच्या खडतर काळात माणुसकीची बांधिलकी जपली पाहीजे असे नमुद करुन, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, आज भारत देश स्वयंपूर्णतेकडे जात असताना, कोरोना संकटाच्या जबडयात सापडलेला आहे. विकसनशील देश म्हणून ओळखला जाणारा भारत आत
विकसित देश म्हणून उदयाला येत असताना, कोरोनाचा दुसरा तडाखा बसला आहे. या संकटावर मात करत असताना, संपूर्ण जगात कोरोनावर लस उत्पादन करणारा भारत हा महत्वपूर्ण देश ठरला आहे. अश्या परिस्थितीत कोरोना लसीकरण शक्य तितक्या लवकर करणे, आणि दुस-या बाजुला कोरोनाग्रस्तांवर प्रभावी आणि सक्षम उपचार करणे अश्या दुहेरी जबाबदारी प्रशासनावर पडत आहे. कोरोनाकाळात, हातावरचे पोट असणा-या अनेक कुटुंबाची उपासमार होऊ नये म्हणून अनेक सामाजिक संस्था आपापल्या परीने पुढे आल्या असल्या तरी कोणताही गरीब अन्नधान्यापासून वंचित राहु नये म्हणून केंद्रसरकारने मे आणि जुन 2021 या दोन महिन्यांकरीता सुमारे 26 हजार कोटी रुपयांची तरतुद करुन, भारतातील प्रत्येक कुटुंबाला गहु, तांदूळ मोफत पुरवण्याचे धोरण आखले आहे. या प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेमधुन भारतातील 80 कोटी व्यक्तींना लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
कोरोनाकाळात, प्रशासनावर विशेष करुन सार्वजनिक आरोग्य विभाग, पोलिस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महसुल विभागांवर सध्या प्रचंड ताण आलेला आहे. या पार्श्वभुमीवर सातारा जिल्हयासह महाराष्ट्रातील प्रत्येक गरीब कुटुंबापर्यंत केंद्रशासनाचे मोफत पुरविणेत येणारे धान्य वेळेत आणि सुलभ रितीने तसेच कोणत्याही प्रकारची गर्दी न होता वितरीत करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे.
मोफत धान्य वाटपाबाबत आम्ही सातारा जिल्हयाच्या जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेशी बोललो आहोत. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या केंद्राच्या मार्गदर्शक सुचना, तत्वे याचा विचार करुन, कृती आराखडा तयार करावा, तयार केला असल्यास तो जाहिर करावा अश्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत.
याकामी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या वितरण व्यवस्थेची माहीती घेवून, प्रसंगी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने वितरण व्यवस्थेचे नियोजन करण्यासाठी प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत. प्रत्येक गरीबांपर्यंत धान्य कसे पोहोच केले जाईल याबाबत आम्ही सर्व स्तरावर कटाक्षाने लक्ष पुरवणार आहोत असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे