Friday, September 4, 2026
spot_img
Home Satara District Phaltan पंढरपूर–फलटण रेल्वे मार्गाचा DPR तयार; मंजुरीच्या दिशेने पुढचे पाऊल!

पंढरपूर–फलटण रेल्वे मार्गाचा DPR तयार; मंजुरीच्या दिशेने पुढचे पाऊल!

5
Adv

पंढरपूर–फलटण रेल्वे मार्गाच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड समोर आली असून, या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला आता गती मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली

पंढरपूर–फलटण आणि देहू राष्ट्रीय रेल्वे मार्गांदरम्यान रेल्वे जोडणी निर्माण करण्याबाबत २७ मार्च २०२६ रोजी लोकसभेतील शून्य प्रहरादरम्यान प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या प्रश्नाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी लेखी उत्तर देताना प्रकल्पाच्या सद्यस्थितीची माहिती दिली.
रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, पंढरपूर–फलटण रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण कार्य पूर्ण झाले असून DPR तयार करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.

आता मंजुरीसाठी विविध यंत्रणांचे परीक्षण
DPR तयार झाल्यानंतर प्रकल्प पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र शासनासह संबंधित विविध भागधारकांशी सल्लामसलत केली जाणार आहे. त्यानंतर नीती आयोग, केंद्रीय अर्थ मंत्रालय तसेच अन्य संबंधित यंत्रणांकडून प्रकल्पाचे परीक्षण आणि आवश्यक मंजुरीची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने प्रकल्प मंजुरीची प्रक्रिया ही सातत्याने सुरू असणारी आणि गतिमान प्रक्रिया असल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधित यंत्रणांकडून होणारे परीक्षण, सल्लामसलत आणि आवश्यक मंजुरी यावर प्रकल्पाच्या अंतिम मंजुरीची कालमर्यादा अवलंबून राहणार आहे.
सोलापूरपासून फलटणपर्यंतच्या विकासाला मिळणार रेल्वेची जोड
पंढरपूर–फलटण रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास सोलापूर, माढा, पंढरपूर, माळशिरस आणि फलटण परिसरातील दळणवळणाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. पंढरपूर हे देशातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही या मार्गाला विशेष महत्त्व आहे.
याशिवाय शेतीमालाची वाहतूक, उद्योग-व्यवसाय, व्यापारी दळणवळण आणि स्थानिक रोजगाराच्या संधी वाढण्यास या रेल्वे मार्गाचा हातभार लागू शकतो. ग्रामीण आणि निमशहरी भागांना रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या बाजारपेठांशी जोडण्याची संधी या प्रकल्पामुळे निर्माण होणार आहे.
लोकसभेतील पाठपुराव्याला महत्त्वपूर्ण यश
पंढरपूर–फलटण रेल्वे मार्गासाठी लोकसभेत सातत्याने प्रश्न उपस्थित करून रेल्वे मंत्रालयाकडे लेखी पाठपुरावा सुरू असल्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले आहे. सर्वेक्षण पूर्ण होऊन DPR तयार होणे हा या प्रकल्पाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
आता DPR नंतरची प्रशासकीय प्रक्रिया किती वेगाने पूर्ण होते आणि केंद्र सरकारकडून या प्रकल्पाला अंतिम मंजुरी कधी मिळते, याकडे सोलापूर, माढा, पंढरपूर, माळशिरस आणि फलटण परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Adv