पालिकेच्या नूतन सभापतींची 11 जानेवारी रोजी होणार निवड

63
Adv

सातारा पालिकेच्या विषय समित्यांच्या सभापती पदासाठी सातारा विकास आघाडीत पुन्हा मोर्चेबांधणी सुरु झाली आहे . खासदार उदयनराजे भोसले हे नव्या चेहऱ्यांना संधी देणार की विद्यमान सभापतींना मुदतवाढ मिळणार हा खरा कळीचा मुद्दा असून नक्की काय निर्णय होणार याविषयी राजकीय वर्तुळात औत्सुक्य आहे .

गेल्या पाच वर्षात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उपनगराध्यक्ष पदासह विषय समित्यांचे सभापती व सदस्य या पदावर एकूण चौदा नगरसेवकांना संधी दिली . राजू भोसले , सुहास राजेशिर्के , किशोर शिंदे व मनोज शेंडे यांनी गेल्या पाच वर्षात टप्याटप्याने उपनगराध्यक्ष पद भूषविले . विद्यमान पाणीपुरवठा सभापती यशोधन नारकर , नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे , आरोग्य सभापती अनिता घोरपडे , बांधकाम सभापती मिलिंद काकडे , व महिला बाल कल्याण सभापती सुनीता पवार यांच्या सभापती पदाची मुदत चार जानेवारी रोजी संपत आहे .

त्यामुळे नव्या सभापती पदाच्या निवडी साठी सातारा विकास आघाडीमध्ये मोर्चेबांधणी सुरु झाली आहे . मात्र करोना संक्रमणाचा प्रतिबंध करण्यात पालिका प्रशासनाचे दहा महिन्यापेक्षा अधिक कालावधी खर्च झाला . करोना व्यतिरिक्त इतर विकास कामांच्या निधीवर खर्चाची मर्यादा आल्याने वर्षभरात फेब्रुवारी महिन्यात झालेल्या बैठकांचा अपवाद वगळता पुढील दहा महिन्यात काहीच बैठका न झाल्याने विकास कामांचे प्रस्तावही पडून राहिले त्यामुळे यंदा विद्यमान सभापतींनांच संधी दिली जावी असा सूर लावला जात आहे . मात्र पुढील दहा महिन्यानंतर पालिका निवडणुका लक्षात घेता उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या जोडीला गतीशील आणि कृतीशील सभापतींची निवड व्हावी जेणेकरून सातारा विकास आघाडीच्या विकास कामांचा रोडमॅप तयार होऊ शकेल अशी मांडणीसुद्धा होऊ लागली आहे . काही अनुभवी चेहरे आणि काही नवीन चेहरे यांची सांगड घालून सभापती पदाचा उमेदवार निवडला जावा अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्याकडे होत आहे .

अर्थात अंतिम निर्णय उदयन राजेंचा असून ते पुण्यावरून जानेवारी च्या पहिल्या आठवड्यात परततील अशी माहिती आहे . उदयनराजेंचे निर्णय हे धक्कातंत्र असते त्यामुळे कदाचित सर्वं च सभापती बदलले सुद्धा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही . विद्यमानांना मुदतवाढ की नव्या चेहऱ्यांना संधी या विषयावर पुन्हा सातारा विकास आघाडीची बैठक होण्याची शक्यता राजे समर्थकांकडून व्यक्त होत आहे .

चौकट –

सातारा उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी सोमवार दि 11 रोजी सकाळी ११ वाजता पालिकेची विशेष सभा विषय समितीच्या सभापती निवडीसाठी बोलाविली आहे . विषय समिती व स्थायी समितीच्या रिक्त पदांसाठी सदस्यांचे नामनिर्देशन करणे , नामनिर्देशित सदस्यांमधून सभापती व शिक्षण समितीच्या पदसिद्ध सभापतीची निवड जाहीर करणे या तीन विषयांसाठी पालिकेची ऑनलाईन विशेष सभा बोलाविली आहे . ही सभा कोणत्याही परिस्थितीत तहकूब होणार नाही असे मिनाज मुल्ला यांनी कळविले आहे . सभापती निवडीची पालिकेची विशेष सभा जाहीर झाल्याने राजकीय मोर्चेबांधणी ला सुरवात झाली आहे .

Adv