माणदेशी उद्योजिकांची कामगिरी जागतिक स्तरावरची- ना. डॉ. नीलम गोऱ्हे*

158
Adv

अस्सल ग्रामीण संस्कृतीचा मुंबईकरांना अनुभव देणाऱ्या माणदेशी महोत्सवाचे मुंबईतील हे चौथे वर्ष आहे. या माणदेशी महोत्सवाचे उद्घाटन विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. यंदा ९ जानेवारी ते १२ जानेवारी २०२० दरम्यान “माणदेशी महोत्सव” रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात रंगणार आहे. यावेळी माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, डाऊचे सीईओ सुधीर शेणॉय, एचएसबीसीचे सीईओ रोशा, माणदेशी महिला बँकेच्या सीईओ रेखा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या उदघाटनपर भाषणात ना.डाॅ. नीलम गोऱ्हे माणदेशी महोत्सवाचे कौतुक करत म्हणाल्या कि, “माणदेशी भगिनींची कामगिरी जागतिक स्तरावर नोंद घेण्यासारखी आहे. बॅंकेचे गुन्हेगार पैसे घेऊन पळून जातात पण ९९% महिला बचतगट पैशांची परतफेड करतात हे अभिमानास्पद बाब आहे. माविम, बॅंका, अन्य संस्था यांना घेऊन शासकीय उद्योगधोरणामध्ये जमीन मिळण्याच्या अंमलबजावणीचे शिफारस लवकरच बैठक घेऊन शासकीय अधिकाऱ्यांना करणार असल्याचे त्यांनी सूतोवाच केले. माणदेशी भगिनींसाठी मुंबईतील बाजारपेठ मिळवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सहकार्याने प्रयत्न करणार असल्याचे ना.डॉ.गोऱ्हे सांगितले. तसेच मुंबई बचत गटाच्या आठवडी बाजारासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. स्त्रीची आर्थिक परिस्थिती बदलली कि मान -सन्मान मिळतो. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हा असे आवाहन ना.डॉ.गोऱ्हे यांनी केले. आजच्या काळात एखाद्या महिलेकडे साधनसामग्री किती यांवर महिलेची पत ठरते. सद्य काळात धार्मिक पर्यटनाचा व्यवसाय प्रचंड प्रमाणावर सुरु आहे. या ठिकाणी माणदेशी महिलांनी खानपान सेवा द्यावात.” असे त्यांनी सुचविले. महिला सरपंच असलेल्या गावात महिला वाचनालयासाठी ५१०००/- रुपयांची देणगी आमदारनिधीतून देणार असल्याचे त्यांनी यावेळी घोषित केले. महिला सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सूचनेनुसार गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाईंसोबत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बैठक घेणार असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी माणदेशी भगिनींना विधानभवनास भेट देण्याचे त्यांनी निमंत्रण दिले.

माणदेशी फाउंडेशनचे अध्यक्षा चेतना सिन्हा म्हणाल्या कि, दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आमचे शेतकरी दूध, ताक विकतात पण त्यांना लोणी मिळत नाही. शेतकरी जर श्रीमंत असेल तर देश श्रीमंत होईल. माणदेशी उद्योजिकांसाठी बाजारपेठ, भांडवल आणि तंत्रज्ञान आवश्यक आहे. प्राचीन शहाणपण आमच्याकडे आहे . पण आधुनिक तंत्रज्ञान आम्हांला पाहिजे. माणदेशी महिला शिकल्या नसतील पण उद्योगात त्या कुठेच कमी पडत नाहीत. माणदेशी महिला उद्योजिका ईकाॅमर्सवर आहेत हे ईकॉमर्स कंपनीचे भाग्य कारण कष्टकरी महिला येथे आल्या आहेत. पहिलं बिझनेस स्कूल या महिलांनी सुरु केले. मुंबईत येणं आणि टिकणं महत्वाचं आहे ते माणदेशी महिला करतात.
माणदेशी महिला सहकारी बॅकेच्या सीईओ रेखा कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले.

*नोट*
*◆ महोत्सवाच्या संदर्भातील माहिती*
साताऱ्यातील माण तालुका. एक दुष्काळग्रस्त भाग. दुष्काळामुळे शेती नाही, हाताला काम नाही. परिणामी अठराविश्व दारिद्र्य. मात्र माणदेशी भगिनींच्या आयुष्यात चेतना सिन्हा माणदेशी महिला सहकारी बॅंकेच्या रुपाने आल्या आणि संपूर्ण कायापालटच झाला.
● महिलांना स्वयंरोजगार गवसला. माणदेशी भगिनी उद्योग-व्यवसाय करु लागले. पण तयार केलेल्या उत्पादनाची बाजारपेठ कुठाय? त्यातूनच जन्मास आला ‘माणदेशी महोत्सव’.गावाकडील संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मुंबईकरांनी या महोत्सवात येऊन आनंद घ्यावा असे आवाहन माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा केले. यंदा तर कोणत्याही महिलेस उद्योग करायचा असेल तर उद्योगोपयोगी असणाऱ्या यंत्रसमुहाचा या महोत्सवात समावेश करण्यात आला आहे.
● या यंत्र समूह पहा. उद्योग समजून घ्या. यंत्र खरेदी करुन तात्काळ व्यवसाय सुरु करा अशी यामागची संकल्पना. खऱ्या अर्थाने महिला उद्योजिका घडविण्याचा हा अचूक प्रयोग आहे.
◆ यासोबत या महोत्सवात प्रसिद्ध भारुडकार चंदा तिवाडी आपली कला सादर करणार आहे. ख्यातनाम गायिका मृदुला दाढे-जोशी आणि गावरान गोडवा असलेल्या आरजे केराबाई यांची जुगलबंदी म्हणजे दुग्धशर्करा योग. माणदेशी कम्युनिटी रेडिओच्या ग्रामीण कलाकारांचे सादरीकरण, माणदेशी चॅम्पियन महिला कुस्ती. त्याचबरोबर लोकनृत्याचा प्रकार असलेले ‘गझी नृत्य’ पाहण्यास मिळेल.
काय आहे यंदा माणदेशी महोत्सवामध्ये पाहण्यासाठी / खरेदी करण्यासाठी :
◆ गावाकडचे किल्ले, गावाची चावडी, घराचा ओटा, घरासमोरील पडवी, गुरे-ढोरे या सर्वाचा अनुभव सेल्फी पॉंईटमधून मुंबईकरांना घेता येणार आहे. यंदा सुरवात होतेय ती माणदेशी महोत्सवाच्या प्रवेश द्वारापासून, गावाकडील संस्कॄती, आणि विविध स्कल्प्चर्सचा देखावा पाहता येणार आहे.
◆ मुंबईकरांना या महोत्सवामध्ये माणदेशीची खासियत असलेले माणदेशी जेन, घोंगडी, दळण्यासाठी जाती व खलबत्ते, केरसुण्या, दुरड्या, सुपल्या, हे साहित्य खरेदी करता येणार आहेत. तसेच माणदेशी माळरानातली गावरान ज्वारी, बाजरी, देशी कडधान्य, तसेच चटकदार चटण्या व मसाल्यांची चव चाखता येणार आहे. या वर्षी माणदेशी महोत्सवात १०० ग्रामीण उद्योजक आपल्या उत्पादनांद्वारे सहभागी होणार आहेत. त्याचसोबत घरच्या घरी तयार केलेल्या खास सातारी टच असलेल्या विविध चटण्या, पापड, लोणचं, खर्डा, ठेचा, शेव-पापड ते अगदी पेयांपर्यंत सारं काही उपलब्ध आहे.
◆ हाताने मडकं तयार करा, स्वत: उभं राहून लाटणं तयार करुन घ्या, लाखेच्या बांगड्या बनवून घ्या, टोपली किंवा झाडू वळवून घ्या, हे सारं काही गावातलं येथे अनुभवता येणार आहे. जर तुम्ही खवय्ये असाल तर
◆ साताऱ्याचा खर्डा, शेंगदाण्याच्या चटणीसह वेगवेगळ्या चटण्या, लोणची, ज्वारीची भाकरी, कुरड्या, भातवड्या, साताऱ्याचे जगप्रसिद्ध कंदी पेढे तुमच्या प्रतिक्षेत आहेत.
साताऱ्यातील महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी कारागीरांना देखील महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. तेव्हा माणदेशी महोत्सवाला भेट द्या. तुमची भेट या आपल्या माणदेशी भगिनींचं मनोधैर्य वाढवेल. ९, १०, ११, १२ जानेवारी या दरम्यान सकाळी १०.३० ते ८.३० या वेळेत कधीही भेट देता येणार आहे. हा महोत्सव सर्वांसाठी मोफत आहे. मुंबईतला माणदेशी परिवार आपलं स्वागत करण्यास सज्ज आहे.

Adv