काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडून सावकर यांच्याबाबती अपशब्द वापरणे सुरु आहे. इंदिरा गांधी यांनी सावरकर यांच्या स्मारकासाठी 11 हजार रुपयांची मदत केली होती. सावरकरांच्या नावाने पोस्टाचे तिकीट काढले होते. त्याची तरी राहुल गांधी यांना आठवण आहे काय?. राहुल गांधी जे बोलतात ते कधीच खरे नसते, असा टोला भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी लगावला. दरम्यान, त्यांनी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजेंना सत्तेत असताना शहाणपण चालू दिले नाही आता कुठे चालू देणार अशी टीप्पणी त्यांनी केली. तसेसच 2024 ला जिह्यात चार आमदार आणणार असा दावा त्यांनी मै जो बोला ओ बोला, असा डायलॉग मारत दावा केला.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे अतुल भोसले, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. आमदार जयकुमार गोरे म्हणाले, राहुल गांधी यांच्याकडून महापुरुषांचा अवमान सतत सुरू आहे. सावकार यांच्या बाबतीत अपशब्द वापरणे हे त्यांचे नित्याचे बनले आहे. भाजपा शिवसेनेनी मिळून निर्णय घेतला आहे. सावरकर गौरव यात्रा महाराष्ट्रात काढायची. सातारा जिल्ह्यात ही यात्रा प्रत्येक तालुक्यात 6 तारखे पर्यंत पोहचणार आहे. या यात्रेत सावकरांच ऐतिहासिक कार्य दाखवले जाणार आहे, असे सांगत ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणे ही गांधी परिवाराची नित्याची बाब बनली आहे. तसेंच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत म्हणणारे उद्धव साहेब कोणाच्या मांडीला मांडी लावूनबसतात?, ज्या यात्रेत सावरकर यांचा अवमान झाला. त्या यात्रेत आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. राहुल गांधी यांनी अनेक वर्षांपासून अशी भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे यांची युती सत्तेसाठी होती. विचारांची नव्हती. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेससारखे पक्ष तर औरंगजेबाचे कौतुक करु लागले आहेत. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा सातारा भाजपा तीव्र शब्दात निषेध करते आहे, असे सांगितले.
वाई तालुक्यातील लोहारे येथील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबास भाजपाच्यावतीने शासनाकडून जी काय मदत आहे ती मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे विचारलेल्या प्रश्नांवर गोरे यांनी उत्तर दिले. दरम्यान, सरकार कुठेही जाणार नाही. पूर्ण काळ करणार, आम्ही चौघे पुढच्या विधानसभेला आमदार असणार असा दावा त्यांनी केला.
संजय राऊत यांच्याबाबत प्रश्न छेडला असता ते म्हणाले, राऊत यांना आता मिरजेला कृपा हॉस्पिटल आहे तेथे भरती केले पाहिजे त्यांच्या मेंदूवर परिणाम झाला आहे. ते काहीही बरळत असतात, अशी सडकून टीका केली. पुढे आमदार गोरे म्हणाले, बाजार समितीच्या निवडणूकीच्या अनुषंगाने भाजपाची तयारी सुरु आहे. जिल्ह्यात भाजपा एक नंबरचा पक्ष आहे. बाजार समितीमध्ये स्थानिक पातळीवर सहकारातल्या निवडणूका लढवण्यामध्ये भाजपा कुठेही कमी पडणार नाही. मात्र, नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषद ही भाजपाच्याच तिकीटावर लढवण्यात येणार आहे.
चौकट
रामराजेंचा शहाणपणा सत्ता नसताना चालू दिला नाही आता आमची सत्ता असताना चालू देणार नाही, असे टीप्पणी करत जे लोक पूर्वी समृद्धी महामार्गाला विरोध करत होते तेच पुन्हा आमची जमिन घ्या म्हणून विनवणी करु लागले. म्हसवड एमआयडीसीचा कॉरिडॉर होणार आहे तो कुठेही जाणार नाही. त्यावेळी रामराजेंचा कोरेगावला एमआयडीसी नेण्याचा प्रयत्न सुरु होता तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे काँग्रेसचे माण तालुक्यातील नेते म्हसवडला एमआयडीसी असावी म्हणून आंदोलन करत होते. त्यांच्या मुळ पक्षात सुद्धा तसेच शिकवले जाते.अशीही टीप्पणी गोरे यांनी केली.