जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्याच्या विकासासाठी विविध विभागांना निधी देण्यात आला आहे. हा निधी परत जाणार नाही याची दक्षता घेऊन हा निधी 100 टक्के खर्च करा. पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि राज्यमंत्री म्हणून जिल्ह्यासाठी वाढीव निधी आणू अशी ग्वाही आज वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज केल्या.
शंभूराज देसाई हे वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री असल्याने त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चाबाबतचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे आदी उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजनेमधून केलेल्या खर्चाची माहिती वेळोवेळी जिल्हा नियोजन विभागाकडे द्यावी, अशा सूचना करुन श्री. देसाई पुढे म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून विविध विभागांना निधी देण्यात आला आहे हा निधी कोणत्याही परिस्थिती परत जाणार नाही याची दक्षता घ्यावी. कौशल्य विकास विभागाने विद्यार्थ्यांसाठीचे कौशल्य विकास कार्यक्रमाचा आराखडा तयार करावा. विविध शिक्षण संस्थांच्या मदतीने विद्यार्थ्यांना कौशल्य विकासासाठी नवीन धोरण आखले जाईल. समाज कल्याण विभागाकडे तांडावस्ती सुधार योजनेंतर्गत निधी प्राप्त झाला आहे. तांडावस्तीतील कामांची प्रशासकीय मान्यता तात्काळ घ्यावी.
जिल्ह्यातील प्रश्नांबाबत मंत्रालयस्तरावर करावयाच्या असतील त्या मला सांगा एक राज्यमंत्री म्हणून सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. सर्व प्रशासकीय अधिकारी आपण सर्वांनी समन्वयाने काम करु, असेही वित्त व नियोजन मंत्री श्री. देसाई यांनी या बैठकीत सांगितले.
यावेळी वित्त व नियोजन मंत्री श्री. देसाई यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामकाजाचा आढावाही घेतला. या बैठकीला जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांच्यासह विविध विभागांचे खाते प्रमुख उपस्थित होते.